मुंबई : धावत्या लोकलमध्ये एका २९ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना पश्चिम रेल्वे मार्गावर घडली. या घटनेतील २५ वर्षीय आरोपी राजेश विश्वकर्माला अंधेरी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) अटक केली. आरोपी गर्दुल्ला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही घटना घडत असताना महिला प्रवाशांकडून डब्यातील साखळी खेचण्यात आली होती. तरीही ही लोकल बोरीवली ते अंधेरीदरम्यान कोणत्याही स्थानकावर थांबली नाही. याविरुद्ध रेल्वे पोलिसांकडून पश्चिम रेल्वे प्रशासनाला लेखी विचारणाही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. डहाणू ते चर्चगेट जलद लोकलच्या फर्स्ट क्लास महिला डब्यातून (विरार दिशेने) २९ वर्षीय तरुणी प्रवास करत होती. त्या वेळी डब्यातून अन्य दोन महिलाही डब्यात होत्या. ही लोकल दुपारी २.२५ च्या सुमारास बोरीवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर आली, तेव्हा राजेश विश्वकर्मा याच डब्यात चढला. लोकल सुरू होताच राजेशने डब्यातील २९ वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. त्याला तरुणीने विरोध केला. राजेशकडून जबरदस्ती सुरू होताच, तरुणीने मदतीसाठी आरडाओरड केली. तेव्हा डब्यातील इतर महिलांनी राजेशला बेदम चोप दिला. साखळी खेचूनही अंधेरी स्थानक येईपर्यंत लोकल थांबलीच नाही. तोपर्यंत महिलांकडून राजेशला चोप देणे सुरूच होते. अखेर अंधेरी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर लोकल आल्यानंतर महिलांनी राजेशला स्थानकात उतरविले. झालेला प्रकार समजताच प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांनीही राजेशला चोप देत, रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. (प्रतिनिधी)
लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग
By admin | Published: February 02, 2016 3:47 AM