Join us

तृतीयपंथीयाकडून मुलीचा विनयभंग, चारकोप पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 10:32 PM

विनयभंगाचा गुन्हा दाखल, पोक्सोअंतर्गत कारवाई करणार असल्याची पोलिसांची माहिती.

मुंबई - तृतीय पंथीयाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार गुरुवारी चारकोपमध्ये घडला. एकनाथ शिंदे (30) असे त्याचे नाव असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

चारकोपच्या आनंदीबाई केणी चाळीमध्ये गुरुवारी सकाळपासुन चार ते पाच तृतीयपंथीयांची एक टोळी पैसे मागत फिरत होती. त्यावेळी त्यातील शिंदे हा एका घराजवळ थांबला आणि त्याने पैशांची मागणी केली. मात्र, त्या घरात कोणीच नव्हते आणि एक चौदा वर्षीय मुलगी सोफ्यावर औषध घेऊन झोपली होती. त्याचा फायदा घेत शिंदे त्या घरात शिरला आणि त्याने दरवाजाची कडी आतुन बंद केली. तितक्यात त्या मुलीची मोठी बहिण त्याठिकाणी आली आणि तिने दरवाजा ठोठावला. तेव्हा शिंदेने दार उघडले जे पाहून तिने आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत शिंदेला चांगलाच चोप दिला. त्यानंतर, पोलिसांच्या स्वाधीन केले. जे पाहून त्याच्यासोबत असलेले अन्य चौघेजण पसार झाले. पोलिसांनी शिंदे आणि घरात झोपलेल्या मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठविले. 'शिंदे खरच तृतीयपंथी आहे की निव्वळ बनाव करत आहे, हे वैद्यकीय चाचणीनंतर स्पष्ट होईल. मात्र, त्याच्यावर आम्ही पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे', अशी माहिती चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद धावरे यांनी दिली.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीविनयभंग