Join us

चालत्या रिक्षात चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; घाटकोपरमधून चालकाला अटक

By मनीषा म्हात्रे | Published: August 21, 2023 7:56 PM

गुन्हे शाखेची कारवाई, गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी साडे बारा ते पावणे एकच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी खासगी शिकवणीवरून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली.  

मुंबई : खासगी शिकवणीवरून रिक्षाने घरी निघालेल्या १३ वर्षीय मुलीचा चालकानेच विनयभंग केला. याप्रकरणी गुन्हे शाखेने रिक्षाच्या क्रमांकावरून आरोपीचा शोध घेत त्याला घाटकोपर भागातून अटक केली आहे. बनश्याम सोनी असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी साडे बारा ते पावणे एकच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी खासगी शिकवणीवरून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. याच,पवई हिरानंदानी ते मोरारजी नगर असा रिक्षाने प्रवास करत असताना जे. व्ही. एल.आर रोडदरम्यान रिक्षा चालकाने अश्लील हावभाव करत मुलीसोबत अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. मुलीने विरोध करताच, “मुझे अच्छ लगता है” असे बोलून तिचा विनयभंग केला. मुलीने घर गाठून घडलेला प्रकार आई वडिलांना सांगताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पवई पोलिसांनी विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. गुन्हे शाखेने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत समांतर तपास सुरु केला.

आरोपीच्या रिक्षाचा क्रमांक हाती लागताच गुन्हे शाखेने घाटकोपर एलबीएस रोडवरून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देताच त्याला पवई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी त्याला अटक करत अधिक तपास करत आहे. त्याचा गुन्हे अभिलेख तपासण्यात येत आहे. अटक करण्यात आलेला ५६ वर्षीय रिक्षाचालक हा दिवा येथील रहिवासी आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष १० चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तोडकर, पोलीस अंमलदार जगदीश धारगळकर, संतोष धनवडे, अमित जगताप, पवन शिंदे व  चंद्रशेखर डफळे यांनी ही कारवाई केली आहे.