कॉटनग्रीन स्कायवॉकवर विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 07:01 AM2017-07-24T07:01:55+5:302017-07-24T07:01:55+5:30
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर असलेल्या कॉटनग्रीन रेल्वेस्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकवर विनयभंगाच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर असलेल्या कॉटनग्रीन रेल्वेस्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकवर विनयभंगाच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमुळे स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी युवा ऊर्जा फाउंडेशनने काळाचौकी पोलिसांकडे केली आहे.
फाउंडेशनचे अक्षय मंचेकर यांनी सांगितले की, गेल्या महिन्याभरात या ठिकाणी दोन तरुणींचा विनयभंग झाल्याची तक्रार फाउंडेशनकडे आली. धक्कादायक बाब म्हणजे, दोन्ही प्रकार दिवसाढवळ््या घडले आहेत. भीतीपोटी दोन्ही तरुणी पोलिसांत तक्रार देण्यास धजावत नव्हत्या. अखेर फाउंडेशनच्या सदस्यांनी विश्वासात घेऊन तरुणींना काळाचौकी पोलिसांत तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी कडक कारवाई करत महिलांना सुरक्षा पुरवण्याची गरज आहे.
स्कायवॉक म्हणजे स्थानिक झोपडपट्टीवासीयांसाठी मोफतची धर्मशाळा झाल्याचा आरोप फाउंडेशनचे आशिष चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण म्हणाले की, दुपारी आणि सायंकाळी या ठिकाणी प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे सुरू असतात. तर सायंकाळपासून गर्दुल्ले आणि मद्यपींसाठी हा स्कायवॉक म्हणजे अड्डा झाला आहे. रात्रीच्या वेळेस स्कायवॉकखालील झोपडपट्टीमधील पुरुष कामगार या ठिकाणी झोपायला येतात. त्यात तळीरामांची मैफलही रंगते. परिणामी, सायंकाळनंतर या ठिकाणाहून जाण्याचे धाडस महिला प्रवासी चुकूनही करत नाहीत. परिणामी, महापालिका आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणी योग्य ती सुरक्षा पुरवण्याची नितांत गरज आहे.
तार्इंनो, पुढे येऊन
तक्रार करा!
कॉटनग्रीन स्थानकाच्या पूर्वेला रिकामी गोदामे असल्याने हा गर्दुल्ल्यांचा अड्डा झाला आहे. नशेमध्ये काही गर्दुल्ले दिवसाढवळ््याही महिला आणि तरुणींची छेड काढत आहेत. बदनामी आणि भीतीपोटी पीडितांकडून तक्रार होत नसल्याने या प्रकारांत वाढ होत आहे. त्यामुळे महिला किंवा तरुणींनी अशा प्रकारांबाबत पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन फाउंडेशनचे अजय लांडे यांनी केले आहे.
अजूनही धाडस होत नाही!
भरदिवसा छेडछाड झाल्यापासून स्कायवॉकवरून जाण्याचे धाडसच होत नसल्याची प्रतिक्रिया पीडित तरुणीने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे. पीडित महिला म्हणाली की, गेल्या आठवड्याभरात या ठिकाणी आणखी एक छेडछाडीचे प्रकरण घडल्याचे कळाले. त्यानंतर फाउंडेशनचे सदस्य संपर्कात आले. म्हणून त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. सदस्यांनी धीर देत तक्रार करण्याचे आवाहन केले. तक्रार केली असली, तरी स्कायवॉकवरून जाण्याची हिंमत आजही होत नाही.
महापालिका लक्ष देणार का?
स्कायवॉकवरील बहुतेक दिवे बंदावस्थेत आहेत. त्यात रात्रीच्या वेळेस पुरुष मंडळी झोपत असल्याने महिला प्रवासी स्कायवॉकचा वापर करत नाहीत.
दिवे बंद असल्याने रात्री पुरुष प्रवासीही स्कायवॉकखालून जाण्यातच धन्यता मानतात. यासंदर्भात एमएमआरडीए आणि महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून मागणीकडे साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोप अक्षय मंचेकर यांनी केला आहे.