आई-बाबांनी कधीच अतिलाड केले नाहीत - सचिन तेंडुलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:44 AM2018-02-09T01:44:39+5:302018-02-09T01:49:25+5:30
सुदैवाने अत्यंत संतुलित कुटुंब मला लाभले. माझे वडील अत्यंत शांत स्वभावाचे होते आणि आईचाही स्वभाव तसाच आहे. त्यांनी स्वातंत्र्य दिले पण अतिलाड केले नाहीत, अशी आठवण मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शुक्रवारी वांद्रे येथील कार्यक्रमात सांगितली.
मुंबई : सुदैवाने अत्यंत संतुलित कुटुंब मला लाभले. माझे वडील अत्यंत शांत स्वभावाचे होते आणि आईचाही स्वभाव तसाच आहे. त्यांनी स्वातंत्र्य दिले पण अतिलाड केले नाहीत, अशी आठवण मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शुक्रवारी वांद्रे येथील कार्यक्रमात सांगितली. महिनाभर दौºयावर जायचो, तेव्हा आईला काळजी वाटायची. मात्र बाबांचा पूर्ण विश्वास होता. आयुष्यातील याच टप्प्यांनी स्वातंत्र्य आणि जबाबदारी शिकविली. तसेच पत्नी अंजलीने करिअर बाजूला ठेवून पालकत्वाची जबाबदारी पेलल्याचे, सचिनने या वेळी अधोरेखित केले.
लहानग्यांच्या आरोग्याशी संबंधित ‘इव्हन व्हेन देअर इज अ डॉक्टर’ या डॉ. यशवंत आमडेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन एमआयजी क्लब येथे पार पडले. हल्ली प्रत्येक वस्तूसोबत ‘मॅन्युअल’ येते त्याचप्रमाणे आज हे पुस्तकही पालकांसाठी मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडेल. तसेच, सचिनने म्हटल्याप्रमाणे, प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूचे एक विशेष नाते असते. तसेच डॉ. आमडेकर हे कालही माझे गुरू होते आणि आजही आहेत, असे कृतज्ञपूर्वक मनोगत डॉ. अंजली तेंडुलकर यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. वाय.के. आमडेकर म्हणाले, आजचे पालक त्यांच्या लहानपणी जितके निरोगी होते त्या तुलनेत आजची मुले सुदृढ किंवा निरोगी नाहीत. आयुष्यभराच्या सुदृढ आरोग्यासाठी पहिल्या १ हजार दिवसांमध्ये घेतली जाणारी काळजी महत्त्वाची असते, यावर या पुस्तकात भर देण्यात आला आहे. प्रौढ वयात होणाºया आजाराची बीजे आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच रुजलेली असतात, असे डॉ. आमडेकर म्हणाले. या पुस्तकासाठी आमडेकर यांना डॉ. राजेश चोखानी आणि कृष्णन सिवारामाकृष्णन यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. राजेश चोखानी म्हणाले, मुले आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर आपली जबाबदारी संपली, असे अनेक पालकांना वाटते. दुसºया बाजूला, अनेक मुलांवर उपचार करण्यात डॉक्टर व्यस्त असल्याने आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हे सांगण्यासाठी डॉक्टरांकडे पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे दुर्दैवाने, अनेक डॉक्टर हे आरोग्य हितचिंतकाच्या भूमिकेऐवजी फक्त आजार नियंत्रित करण्यापुरते मर्यादित राहतात. सहलेखक कृष्णन सिवारामकृष्णन म्हणाले, प्रत्येक आई-वडिलांना आपल्या घरात मुलांच्या छोट्या आजारांसाठी सुरक्षित प्रथमोपचार करणे शक्य होणार आहे. साध्या आणि स्पष्ट शब्दांत सांगायचे तर, आपण घरच्या घरी काळजी घेऊ शकू असे आजार आणि डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडते असे आजार यात भेद करणे या पुस्तकातून शिकता येईल.