मुंबई : माझ्या आईला शिक्षणाची आस्था होती. मीही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलोे. आई आमच्यासाठी एसटीतून डबा पाठवायची. आम्ही नीट शिकत आहोत की नाही याची चौकशी करण्यासाठी स्वत: जातीने शाळेत यायची, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रथम शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. त्या वेळी पवार बोलत होते. त्यांनी स्वत:चे शिक्षणाबाबतचे अनुभव सांगून आईचा वाटा किती मोलाचा आहे, हे अधोरेखीत केले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडही व्यासपीठावर उपस्थित होत्या.आईच्या आस्थेमुळेच आम्ही शिकू शकलो. शिक्षणाचे संस्कार माझ्यासह सर्व भावंडांवर तिच्यामुळे लहानपणीच झाले. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात असलो तरी आम्ही शिक्षण क्षेत्रासाठी काम करीत असतो, किंबहुना त्यालाच पहिल्यांदा प्राधान्य देतो, असे पवार म्हणाले. प्रथम शिक्षण संस्था ही समाजातील दुर्लक्षित मुलांसाठी हिरिरीने काम करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा संस्थेचा मानस आहे. हे काम त्यांनी अखंडे करावे. त्यात आम्ही त्यांना नेहमीच साथ देऊ, अशी ग्वाहीदेखील पवार यांनी दिली.
प्रथम शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षासोबतच महिला धोरणालाही २५ वर्षे पूर्ण होत असल्याची आठवण करून देत महिला दिनाच्या शुभेच्छा शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिल्या.