Join us

लाेअर परळ पुलासाठी मार्च २०२२चा मुहूर्त; आणखी सव्वा वर्ष वाहतूक काेडींचा त्रास  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 2:26 AM

पश्चिम रेल्वेची माहिती,पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी आणि अंधेरी स्थानकातील गोखले उड्डाणपुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे, पालिका व आयआयटीने रेल्वे हद्दीतील पादचारी पूल व उड्डाणपुलांचे सुरक्षा ऑडिट केले होते.

मुंबई : लोअर परळ उड्डाणपुलाचे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. त्यामुळे आणखी सव्वा वर्ष तरी वाहतूक काेंडीचा त्रास सहन करावा लागणार असल्याचा नाराजीचा सूर प्रवाशांमध्ये आहे.पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, रेल्वे हद्दीतील पुलाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. गर्डर बसवण्याचे काम अद्याप झालेले नाही. ते पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण केले जाईल. रेल्वे हद्दीतील भाग पूर्ण होताच पालिका हद्दीत असलेल्या पुलाचे दोन्ही भाग मुंबई पालिकेकडून तयार करण्यात येतील. ते काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. रेल्वे हद्दीतील काम पूर्ण करण्यासाठी पालिकेकडून रेल्वेला निधीही मिळाला आहे.

पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी आणि अंधेरी स्थानकातील गोखले उड्डाणपुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे, पालिका व आयआयटीने रेल्वे हद्दीतील पादचारी पूल व उड्डाणपुलांचे सुरक्षा ऑडिट केले होते. यात लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जुलै २०१८ मध्ये हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. परिणामी, परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. या पुलाचे रेल्वे हद्दीतील काम पश्चिम रेल्वे आणि पालिका हद्दीतील काम मुंबई पालिकेने करण्याचा निर्णय घेतला. पूल निर्मितीसाठी पायलिंगचे आणि अन्य काम १४ नोव्हेंबर २०१९ पासून सुरू आहे.

‘फेररे’चे काम मे २०२१ पर्यंत होणार पूर्णचर्नीरोड आणि ग्रँटरोडला जोडणाऱ्या फेररे उड्डाणपुलाचे कामही मे २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. या पुलावर गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. अन्य किरकोळ कामे बाकी असून ती पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. या कामांसाठी डिसेंबर महिन्यात निविदा खुली केली जाणार आहे. पालिका हद्दीतीलही पुलाचे काम पूर्ण करण्याचे काम मुंबई पालिकेने रेल्वेलाच दिल्याचे ठाकूर म्हणाले.

टॅग्स :मुंबईपश्चिम रेल्वे