मुंबई : भाजपाने जाहिर केलेल्या महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यामध्ये रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना डावलून रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना बारामती लोकसभा मतदार संघातून भाजपची उमेदवारी दिली. त्यामुळे, महादेव जानकर यांनी पुण्यातील मेळाव्यात आपली नाराजी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्र्यांना इशाराही दिला होता. पण, अवघ्या काही तासातच जानकर यांचे बंड थंड झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे जानकरांचे बंड हे क्षणिक ठरले आहे.
सर्व घटकपक्ष एकजुटीने काम करतील, महायुती आणखी भक्कम करतील आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एकदिलाने काम करतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे ट्विट भाजपाने केले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नेत्यांचे आभार मानल्याचेही या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी सर्व मित्रपक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही क्षणातच घटकपक्षांची नाराजी केली. यावेळी, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यामुळे, उद्या कोल्हापूरमधून शक्तीप्रदर्शन करत युतीच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे. या सभेस युतीचे सर्व मित्रपक्ष उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत मित्रपक्षांची भाजप सोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती महादेव जानकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली आहे. सध्या नाही, पण आगामी विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांना सन्मानजनक जागा देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे देण्यात आले आहे. त्यानंतर, घटकपक्षांवर अन्याय होणार नाही, योग्य तो सन्मान आणि भागीदारी दिली जाईल, असे जानकर यांनी बोलताना स्पष्ट केले. तसेच, रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल आजपासून भाजपात असतील आणि मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांच्या प्रचाराला जाणारच, असे जानकर यांनी स्पष्ट केले.