Join us

गणेशोत्सवाआधी महामंडळांना मुहूर्त; महाविकास आघाडी समन्वय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 8:17 AM

राज्यातील विविध महामंडळांवर करावयाच्या नेमणुकांचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

- अतुल कुलकर्णीमुंबई : राज्यातील विविध महामंडळांवर करावयाच्या नेमणुकांचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. गणपतीच्या आधी किमान १० ते १२ महामंडळाच्या नेमणुका जाहीर कराव्यात, यावर महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीने मंगळवारी एकमताने शिक्कामोर्तब केले.  या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते दोन दिवसांत यादी अंतिम करतील. एकमताने ती मुख्यमंत्र्यांकडे पाठवली जाईल. गणपतीच्या आधी कोणत्याही परिस्थितीत यादी जाहीर केली जाईल, यावर एकमत झाल्याचेही सांगितले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील, काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व शिवसेनेच्या वतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई बैठकीला उपस्थित होते. पावसामुळे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे बैठकीला पोहोचू शकले नाहीत. ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे. भाजपच्या दबावतंत्राला बळी पडायचे नाही. आपण लढत राहू व लोकांमध्ये हा विषय घेऊन जाऊ, अशी चर्चा बैठकीत झाली.

शिवसेनेच्या पाठिशी

अनिल परब यांना पाठवलेली नोटीस तसेच खा. भावना गवळींच्या संस्थांवरील धाडी, याची चर्चा झाली. तुम्ही आमच्या एका नेत्यावर कारवाई केली तर, आम्ही तुमच्या चार नेत्यांवर कारवाई करू, असे हे सुडाचे राजकारण सुरू आहे.  नेत्यांनी ही बाब जनतेमध्ये जाऊन सांगितली पाहिजे. आम्ही शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार