वडाळा-गायमुख मेट्रो मार्गावरील मल्टिमोडल इंटिग्रेशनची मुहूर्तमेढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:15 AM2020-12-04T04:15:46+5:302020-12-04T04:15:46+5:30
स्टेशन परिसर कोंडीमुक्त ठेवण्यासाठी नियोजन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : योग्य पद्धतीने नियोजन न झाल्यामुळे मध्य पश्चिम किंवा हार्बर ...
स्टेशन परिसर कोंडीमुक्त ठेवण्यासाठी नियोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : योग्य पद्धतीने नियोजन न झाल्यामुळे मध्य पश्चिम किंवा हार्बर रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांची अक्षरशः घुसमट होते. त्याचीच पुनरावृत्ती मेट्रो स्टेशनच्या परिसरात होऊ नये यासाठी एमएमआरडीएतर्फे मल्टिमोडल इंटिग्रेशन योजना राबवली जाणार आहे. मेट्रो २ आणि ७ या मार्गिकांवरील स्टेशन परिसरात ही कामे सुरू झाली आहेत. पुढल्या टप्प्यात ठाणे ते गायमुख या मार्गावरील मेट्रो ४ आणि ४ अ ची कामे हाती घेतली जाणार आहेत. या कामांसाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया एमएमआरडीएने सुरू केली आहे.
मुंबई मेट्रोतील १२ मार्गांच्या १५५ स्थानकांच्या ५०० मीटर त्रिज्येच्या वर्तुळाकर परिसरातील क्षेत्रासाठी ३ हजार ८४९ कोटी रुपये खर्चास मान्यता मिळाली आहे. स्टेशन सभोवतालचा २५० मीटर त्रिज्येचा परिसरात बाहुवाहतूक परिवहन एकत्रीकरण या योजनेत केले जाणार आहे. मेट्रो स्थानकातील प्रवेश सुलभता, आपल्या इच्छित स्थळापर्यंत गतीमान प्रवास, अंतिम गंतव्यस्थानकापर्यंत वाहतूक (लास्ट माईल कनेक्टिव्हीटी) उपलब्ध करून देणे हे एमएमआय योजनेचे उद्दिष्ट आहे. वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासरवडवली या मार्गावर मेट्रो ४ धावणार असून या मार्गिकेचा विस्तार कासरवडवली ते गायमुख (४-अ) असा केला जाणार आहे. या सुमारे ३६ किमी लांबीच्या मार्गावर ३४ स्टेशन्स आहेत. १७ स्टेशन्सची दोन स्वतंत्र पॅकेजमध्ये एमएमआयचे काम केले जाणार आहे.
मेट्रो स्टेशन सुरू झाल्यानंतर तिथे दुचाकी, तीन चाकी, खासगी अशा विविध वाहनांनी प्रवाशांची ये-जा सुरू होईल. पायी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी असेल. त्यांच्यासाठी योग्य नियोजन नसेल तर मेट्रोच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल. तसेच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील विश्वास उडाल्यास खासगी वाहनांची संख्या वाढून स्टेशन परिसरावरही ताण येईल. त्यामुळे एमएमआय ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबविण्याकडे एमएमआरडीएचा कल आहे.
सविस्तर नियोजनाचा आराखडा
या स्टेशन परिसराचा विकास कशा पद्धतीने करायचा यासाठी खासगी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. सध्या त्या ठिकाणी असलेला जमीन वापर, त्याचा प्रस्तावित वापर, पर्यावरण आणि सामाजिक परिणाम, मोबिलिटी नेटवर्क, त्यातून महसूल उत्पन्नाची साधने अशा विविध आघाड्यांवर सर्वेक्षण करून सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम सल्लागार करतील. त्याआधारे कामांचे नियोजन करून ती मार्गी लावण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली जाणार आहे.