Join us

पैसा झाला खोटा; दहा रुपयांचे नाणे चालेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:08 AM

मुंबई - पूर्वी दुकानांमध्ये, बस कंडक्टरकडे तसेच बँकांमध्ये सुट्ट्या पैशांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत असे. सुटी नाणी नसल्यास वाण्यासोबत, ...

मुंबई - पूर्वी दुकानांमध्ये, बस कंडक्टरकडे तसेच बँकांमध्ये सुट्ट्या पैशांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत असे. सुटी नाणी नसल्यास वाण्यासोबत, बस कंडक्टर सोबत अनेकदा वाद होण्याचे प्रकार देखील घडत होते; मात्र मागील काही वर्षांमध्ये सुट्ट्या नाण्यांची समस्या पूर्णपणे संपली आहे. आता बँका व दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात सुट्टी नाणी जमा आहेत. त्यामुळे आता जिथे तिथे सुट्टे पैसे नकोच, असे बोलले जात आहे. सुट्ट्या पैशांची मागणी घटल्यामुळे बँकांकडे देखील नाण्यांचा ढीग पडला आहे. यामुळे या सुट्ट्या पैशांचे नेमके करायचे काय असा प्रश्न बँकांना पडला आहे. त्याचप्रमाणे १० रुपयांचे नाणे कुणी स्वीकारण्यास तयारच होत नसल्याचे दिसून येत आहे.

कुठल्याच नाण्यावर बंदी नाही

सध्या अनेक जण नाणी स्वीकारण्यास तयार होत नाहीत. मात्र, चलनात असणारे एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये आणि वीस रुपये यापैकी एकाही नाण्यावर बंदी घातली नाही. अनेकदा अफवा पसरविल्यामुळे ही नाणी स्वीकारली जात नाहीत.

कोणती नाणी नाकारली जातात

वजनाला जड व आकाराला मोठी असणारी नाणी लोकांकडून नाकारण्यात येतात. सुटी नाणी पर्समध्ये अथवा खिशात बाळगणे आता कठीण जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बँकांनी दहा रुपयांचे नाणे चलनात आणले आहे. हे नाणे आकाराला मोठे व वजनदार असल्याने ते अनेकजणांना भार वाटत असल्याचे दिसून येत आहे.

बँकांमध्येही नाण्यांचा मोठा साठा

पूर्वी सुट्ट्या पैशांची विशेषतः एक, दोन व पाच रुपयांच्या नाण्यांची चलनात कमतरता भासायची. मात्र, आता ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध झाल्याने बँकांमधून सुट्ट्या पैशांची मागणी घटली आहे. यामुळे बँकांमध्ये नोटांसहित नाण्यांचाही मोठा साठा शिल्लक आहे.

पैसा असून अडचण

एक, दोन, पाच व दहाची सुटी नाणी पर्समध्ये अथवा खिशात बाळगणे आता कठीण झाले आहे. अनेक दुकानदार नाणी स्वीकारत देखील नाहीत. त्यात १० चे नाणे सहजासहजी कोणी स्वीकारत नाही. त्यामुळे बँकांनी आता १० चे नाणे चलनातून रद्द करायला हवे. - मानसी धुरी, सामान्य नागरिक

अनेकदा ग्राहक शंभर रुपयांची वस्तू घेण्यासाठी १० रुपयांचे १० नाणे घेऊन येतात. अशा वेळेस दुकानदार पाच नाणे स्वीकारतो व पाच नोटा द्या असा आग्रह धरतो. त्यामुळे पैसा असून अडचण अशी स्थिती होते. - प्रदीप पाटकर, सामान्य नागरिक