मुंबई : आईच्या शस्त्रक्रियेसाठीचे पैसे घेऊन रुग्णालयाकडे निघालेल्या तरुणाच्या पैशांवर चोराने डल्ला मारल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करीत, अधिक तपास सुरू केला आहे.दहिसरचे रहिवासी असलेले शिवदास सुरेश साळवी (३७) यांच्या आईला गेल्या वर्षभरापासून हृदयविकाराचा त्रास सुरू आहे. तिच्यावर सर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २३ आॅगस्ट रोजी डॉक्टरांनी तिच्या ब्लॉकेजसाठी शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. त्यानुसार, २३ आॅगस्ट रोजी सकाळी दहा वाजता वडिलांनी शिवदासला त्याच्या आईच्या शस्त्रक्रियेसाठी १५ हजार रुपये रुग्णालयात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार, त्याने ते पैसे कापडी पिशवीत गुंडाळून ती पिशवी खिशात ठेवली.सकाळच्या वेळेस दहिसर रेल्वे स्टेशन येथे गर्दी असल्याने त्याने बोरीवली रेल्वे स्टेशन येथून रेल्वेने जाण्याचे ठरविले. पुढे दहिसर पूल ते शिवाजीनगर ही बस पकडली. प्रवास करत असलेल्या बसमध्येदेखील गर्दी होती. साडेदहाच्या सुमारास बोरीवली रेल्वे स्थानकाजवळ उतरला. पुढे काही अंतरावर गेल्यानंतर खिशातील पिशवी गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने सगळीकडे शोध घेतला. मात्र, पिशवी मिळाली नाही. बसमध्येच गर्दीचा फायदा घेत, पिशवी चोरी केल्याचा संशय त्याला आला. त्याने याबाबत वडिलांना घडलेला घटनाक्रम सांगितला. अखेर, त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
आईच्या शस्त्रक्रियेसाठी जमविलेले पैसे चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 6:09 AM