(लेखमाला - क्रिप्टोचलनाची सुरसकथा)
लेखांक पहिला-
‘पैशांचा रंग कोणता?’ असा प्रश्न विचारल्यावर मनात संभ्रम निर्माण होणे स्वाभाविकच, नाही का? परंतु, पाण्यासारखा पैसा खर्च करणे, तेही कोविड-१९च्या काळात! असे म्हटल्यावर त्याचा रंग काळा असावा अशी शंकेची पाल मनात चुकचुकल्याशिवाय राहत नाही. सध्या कोणतीही गोष्ट ‘डिजिटल’ म्हटली की, कसे एकदम मस्त वाटते! मात्र सायबर-सुरक्षेचा मुद्दा म्हटला की पोटात धस्स होते. ‘डिजिटल इंडिया’ साकारण्यासाठी आता एकदम जबरदस्त प्रयत्न होत असताना ‘डिजिटल पैसा’ हा शब्द मात्र सरकारसाठी अत्यंत कळीचा ठरताना दिसतोय. त्याला ‘डिजिटल चलन (करन्सी)’ म्हणावे की ‘क्रिप्टोचलन (करन्सी)’? हा परत बुचकळ्यात पाडणारा प्रश्न आहेच. त्यात पुन्हा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘सध्या अस्तित्वात असलेले कायदे क्रिप्टोचलन (क्रिप्टोकरन्सी)विषयक बाबी हाताळण्यास अपुरे आहेत.’ असे म्हटल्यानंतर अशा प्रकारच्या डिजिटल पैशांत पैसे गुंतवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेतच. केंद्र सरकार सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातच ‘द क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल २०२१’ असे भारदस्त नावाचे विधेयक संसदेत मांढून क्रिप्टोचलनामधील सौदे (ट्रेडिंग) करण्यास व्यक्ती आणि कंपन्यांना बंदी घालण्याचा प्रयत्न करेल अशी भीती अनेक ट्रेडर्स (तथाकथित?) तज्ज्ञांना वाटतेय. तेव्हा या सर्व गोंधळाचा एक साधकबाधक धांडोळा घेऊन हे प्रकरण नेमके काय? याचा परामर्ष करणाऱ्या लेखमालेतील हा पहिला लेखांक.
एखाद्या देशाचे सार्वभौमत्व ठळकपणे जाणवते ते त्याच्या चलनातून. या चलनाचा मग त्या देशातील राजेरजवाडे (असल्यास!), वा थोर पुरुषांचे फोटो छापलेले असतात. चलनाचा संबंध आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी, सत्ता केंद्राशी आणि ओळखविषयक मानसिकतेशी जोडला गेलाय. मग ‘बिटकॉईन(bitcoin)’सारख्या एखाद्या आभासी चलनाने हे राष्ट्रीय बंध तुटतील का? डिजिटल तंत्रज्ञान बँका वा सरकारांची जागा घेऊन विश्वासार्हतेचे ‘महासंरक्षक’, ‘कर्ताधर्ता’ होऊन जगभरात उद्योग-व्यवसायाची एक नवीन परिसंस्था जन्मास घालतील का?
हेच प्रश्न खरे तर सध्या जगातील बहुतेक राष्ट्रांना पडले असावेत. तेव्हा ‘बिटकॉईन’ ही सध्या जगात प्रचलित असलेल्या विविध क्रिप्टोकरन्सीजपैकी एक लोकप्रिय चलन आहे. क्रिप्टोचलनाची (करन्सीची) साधी सोपी व्याख्या म्हणजे डिजिटल वॉलेटमध्ये साठवलेले ‘डिजिटल पैसे‘ असे म्हणता येईल. ते ऑनलाइन वा एखाद्या कॉम्प्युटरवर किंवा एखाद्या हार्डवेअरवरदेखील साठविलेले असतात. खरे तर, ते एका ऑनलाइन लेजरमध्ये नोंदवलेले असतात. ते सुरक्षित लेजर ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानातून तयार करण्यात आलेले. त्यांचा वापर करणाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे ट्रेडिंग आणि त्याला स्वीकारणाऱ्यांना पेमेंट करण्यासाठी करता येतो. त्या पैशांचा रंग एक खास असतो अर्थात ‘इलेक्ट्रॉनिकली’.
कोणत्याही बॅँक अथवा पेमेंट गेटवेशिवाय हे क्रिप्टोचलन ऑनलाइन पद्धतीने हस्तांतरित केले जाऊ शकते. ‘बिटकॉईन’ आणि ‘इथेरियम’ (ईथर) या जगातल्या सध्या सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीज म्हणजे चलन आहेत. विविध संघटित संस्था, कंपन्या/फर्म्स, उद्योगांनी यात सहभाग घेण्यास सुरुवात केली असून यातील गुंतवणुकीस ‘क्रिप्टोॲसेट्स’ (क्रिप्टोस्थावर मालमत्ता)असे संबोधले जातेय. ८ फ्रेबुवारी २०२१ रोजी ‘टेस्ला’ या जगातील सर्वात मौल्यवान कार उत्पादक कंपनीद्वारे सुमारे दीड अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अशा डिजिटल ॲसेट्समध्ये म्हणजे ‘बिटकॉइन्स’मध्ये केली. त्यामुळे एका बिटकॉईनचे मूल्य एकाच दिवशी १५ टक्क्यांनी वधारून ४४ हजार डॉलर्सवर गेले. जगातील नऊ कार उत्पादकांच्या एकत्रित मूल्यापेक्षा खूपच जास्त मूल्य असलेल्या या कंपनीने नजीकच्या भविष्यकाळात बिटकॉईनच्या रूपात पेमेंट स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय.
कोणत्याही भौतिक स्वरूपात अस्तित्वात नसलेल्या बिटकॉईनची बाजारपेठ सध्या धुमाकूळ घालतेय. ती ८७३ अब्ज डॉलर्सहून मोठी आहे. याविषयी पुढच्या लेखात.
- शैलेश माळोदे
(लेखक विज्ञान पत्रकार आणि बिझनेस क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)