ओटीपी क्रमांक शेअर करताच खात्यातून पैसे गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:06 AM2021-01-22T04:06:56+5:302021-01-22T04:06:56+5:30
मुंबई : अनोळखी व्यक्तीला ओटीपी क्रमांक शेअर करू नका, असे पोलिसांकडून वारंवार सांगूनही अनेकजण याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. ...
मुंबई : अनोळखी व्यक्तीला ओटीपी क्रमांक शेअर करू नका, असे पोलिसांकडून वारंवार सांगूनही अनेकजण याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. अशाच प्रकारे मस्जिद बंदर येथील ट्रॅव्हल कंपनीत काम करणाऱ्या ५४ वर्षीय कर्मचाऱ्याला ओटीपी क्रमांक शेअर करणे भलतेच महागात पडले आहे. ओटीपी क्रमांक शेअर करताच त्यांच्या खात्यातील एक लाख रुपयांवर ठगाने डल्ला मारला आहे. या प्रकरणी पायधुनी पोलीस तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला ११ जानेवारीला एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. त्याने बँक ऑफ बडोदामधून मॅनेजर दीपक शर्मा बोलत असल्याचे सांगत बँकेतील खाते बंद करायचे आहे की सुरू ठेवायचे आहे, अशी विचारणा केली. त्याच बोलण्यावर विश्वास ठेवून सुरू ठेवायचे असल्याचे सांगताच त्याने आधार कार्ड व डेबिट कार्डचे फोटो व्हाट्स ॲपवर पाठविण्यास सांगितले. त्यांनी हे फोटो पाठवताच त्याने मोबाईलवर आलेले ओटीपी घेत त्यांच्या बँक खात्यातील एक लाख नऊ हजार ९४ रुपयांवर हात साफ केला. खात्यातून पैसे गेल्याने त्यांनी पुन्हा शर्मा याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क झाला नाही. अखेर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.