Join us

दोन शस्त्रक्रिया करून  घेतले तीनचे पैसे; बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरविरुद्ध तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 3:02 PM

भांडुप येथील अनिल लाहोटी यांनी पत्नीच्या पोटातील आजाराच्या उपचारासाठी डॉ. बेगानी यांची भेट घेतली.

मुंबई : केवळ दोनच शस्त्रक्रिया करून तीन शस्त्रक्रियांचे पैसे घेतल्याप्रकरणी बॉम्बे हॉस्पिटलमधीलडॉक्टरांविरुद्ध भांडुप येथील रुग्णाने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे तक्रार दाखल केली आहे. याची दखल घेत परिषदेने रुग्णालयाचे सर्जन डॉ. एम. एम. बेगानी यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण विचारले आहे.

भांडुप येथील अनिल लाहोटी यांनी पत्नीच्या पोटातील आजाराच्या उपचारासाठी डॉ. बेगानी यांची भेट घेतली. डॉक्टरांनी पित्ताशय काढणे, हर्निया दुरुस्त करणे आणि पोटातील उभे स्नायू जवळ आणण्याची शस्त्रक्रिया एकाच वेळी करू, असे सांगितले होते. शुल्कही लाहोटी यांनी  भरले. त्यांच्या पत्नीवर १० फेब्रुवारीला शस्त्रक्रिया केल्या. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, त्यांच्या पोटातील दुखणे हे त्यांना पूर्वीसारखेच वाटत होते. त्यामुळे त्यांनी ठाणे येथील डॉक्टरांना दाखविल्यानंतर तुमच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या असून, तिसरी शस्त्रक्रिया करण्यात आलेली नसल्याचे सांगितल्यावर लाहोटींना धक्काच बसला. लाहोटी यांनी सांगितले की, आम्हाला तीन शस्त्रक्रिया करणार असल्याचे सांगून दोन शस्त्रक्रिया केल्या, ती माहिती आम्हाला शेवटपर्यंत दिली नाही.

मला वाटतं, रुग्णाचे नातेवाईक आणि आमच्या विसंवाद झाला आहे. मी पित्ताशयाशी संबंधित एक आणि हर्नियासंबंधित एक अशा दोनच शस्त्रक्रिया केल्या. त्यावेळी भूलतज्ज्ञ म्हणाले, आता तुम्ही येथेच थांबा, आणखी जास्त वेळ भूल देता येणार नाही. त्याशिवाय नातेवाईक जे सांगत आहे, ती तिसरी शस्त्रक्रिया करण्याची गरज नव्हती. या प्रकरणी हॉस्पिटलमध्येही चौकशी केली आहे. मी गेली ४७ वर्षे प्रॅक्टिस करत आहे, मी अशी चूक कधीही करणार नाही.- डॉ. एम. एम. बेगानी, जनरल सर्जन, बॉम्बे हॉस्पिटल

डॉक्टरने रुग्णाची फसवणूक केल्याची तक्रार आमच्याकडे दाखल झाली आहे. त्या संदर्भातील कागदपत्रेसुद्धा दिली आहेत. त्या अनुषंगाने आम्ही त्या डॉक्टरांना त्यांचे स्पष्टीकरण देण्याची कारणे दाखवा नोटीस दिली आहे. डॉक्टरांनी त्यांचे म्हणणे आणि संबंधित कागदपत्रे १५ दिवसांच्या आत सादर करावीत, असे सांगितले आहे. त्यानंतर रुग्णांनी दिलेली कागदपत्रे आणि डॉक्टरांनी दिलेली कागदपत्रे, तसेच दोघांचे त्या विषयावरील म्हणणे ऐकून सुनावणी ठेवण्यात येईल.- डॉ. विंकी रुघवानी, प्रशासक, वैद्यकीय परिषद

टॅग्स :डॉक्टरहॉस्पिटल