- कुलदीप घायवटमुंबई : तुम्ही घराच्या शोधात असाल आणि कोणी दलाल किंवा अधिकारी तुम्हाला म्हाडा किंवा एमएमआरडीएने बांधलेली घरे स्वस्तात देत असेल, तर आत्ताच सावध व्हा. कारण वडाळ्यातील भक्ती पार्क परिसरातील एमएमआरडीएने बांधलेली घरे स्वस्तात घेणे तब्बल ८२ कुटुंबांना चांगलेच महागात पडले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कागदपत्रांची पूर्तता करू न शकल्याने ८२ कुटुंबांना घरांसह पैशांवरही पाणी सोडावे लागले आहे.सुमारे ८ वर्षांहून अधिक काळापासून संबंधित कुटुंबे वडाळ्यातील भक्ती पार्क येथील एमएमआरडीए वसाहतीत इमारत क्रमांक ६, ७, ८ मध्ये राहत होती. मात्र एमएमआरडीएच्या तपास पथकाने केलेल्या पाहणीत संबंधित कुटुंबे अनधिकृतपणे राहत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रशासनाने रहिवाशांना घरे खाली करण्याची नोटीस बजावली. त्या वेळी रहिवाशांनी प्रशासनाविरोधात दिवाणी न्यायालयात धाव घेतली. दिवाणी न्यायालयात विरोधात निकाल लागल्यानंतर रहिवासी उच्च न्यायालयापर्यंत गेले. मात्र पुरेशी कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने रहिवाशांना हार पत्करावी लागली.काही दलालांनी अधिकारी असल्याचे सांगून घरे विकल्याचा आरोप पीडित रहिवाशांनी केला आहे. मात्र कागदपत्रांअभावी घरे घेणाºया रहिवाशांना प्रशासनाने घुसखोर ठरवले आहे. त्यामुळे स्वस्तात घरे घेण्याची हाव तब्बल ८२ कुटुंबांच्या अंगलट आल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले.स्वमालकीचे घर हातातून गेल्याने आणि मुंबईत भाड्याने घर घेणे शक्य नसल्याने आता रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने घरातून हुसकावून काढल्याने नोकरी पाहायची की मुलांची शाळा की घर शोधायचे, असा प्रश्न पडला आहे.- देवेंद्र बेर्डे, पीडित रहिवासी
‘पैसेही गेले, अन् घरही गेले’, दलालांची घरे पडली महाग, वडाळ्यातील भक्ती पार्क परिसरातील ८२ कुटुंबे रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 5:49 AM