केईएम रुग्णालय स्वायत्त संस्थेतील पाच कोटींचा घोटाळा प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केईएम रुग्णालयातील डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्टमधील पाच कोटींचा घोटाळाप्रकरणातील मुख्य आरोपी असलेला लेखापाल श्रीपाद देसाई अजूनही पसार असून, त्याने कोर्टात धाव घेतली आहे. तर, अटक लिपिक राजन राऊळच्या चौकशीतून अपहार केलेल्या रकमेतील पैसे विविध कंपन्यामध्ये गुंतविल्याची माहिती समोर आली आहे.
केईएम रुग्णालयाला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १९९१ च्या सुमारास तत्कालीन प्राध्यापक, शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने ‘डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट’ या नावाने एका स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली होती. गेल्या दहा वर्षांत संस्थेतील कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या लेखापाल आणि लिपिकाने बनावट सह्यांद्वारे तसेच खोटी कागदपत्रे तयार करून सदर स्वायत्त संस्थेचा निधी अन्यत्र वळविला. सुमारे पाच कोटींचा अपहार केला. ही बाब संस्थेचे मानद अध्यक्ष डॉक्टर हेमंत देशमुख यांना समजताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी गेल्या आठवड्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात राजनला अटक झाली. राजन ह देसाईच्या सांगण्यावरून काम करत होता. यातून मिळणारे पैसे त्याने त्याच्याच विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र देसाईच्या चौकशीतून हे पैसे नेमके कुठे व कसे गुंतविले हे उघड होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
.............................................................