शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला दिल्लीतून येतोय पैसा, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 03:38 PM2022-10-03T15:38:19+5:302022-10-03T15:38:56+5:30
शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी दिल्लीतून पैसा येतोय, असे तपासे यांनी म्हटले आहे.
मुंबई - दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी व्हावी यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. शिंदे-ठाकरे गटाने दसरा मेळाव्यासाठी टीझर प्रसिद्ध केले आहेत. शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यात मातोश्रीबाहेर लावलेल्या एका बॅनरनं सगळ्यांचे लक्ष वेधले. दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहावी यासाठी राष्ट्रवादीकडून बॅनर्स लावण्यात आले आहे. त्यावरुन, आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी दिल्लीतून पैसा येतोय, असे तपासे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सचिन अहिर, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. एक संघटना, एक विचार आणि एकच मैदान शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरा अखंड राहू द्या असं सांगत खूप खूप शुभेच्छा राष्ट्रवादीकडून देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे मुंबई सचिव दिनेशचंद्र हुलवळे, राजू घुगे यांनी हे बॅनर्स लावले आहेत. त्यावरुन आता वाद सुरू असातना राष्ट्रवादीने भाजपकडून शिंदे गटाला रसद पुरविण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
आरोप करणारे करत असतात, आता आम्हीही बातमी वाचली की शिंदे गटाच्या बीकेसी मैदानातील मेळाव्याला महाराष्ट्रात ३ हजार बसेस येत आहेत. मग, या खर्चांसाठी कोण स्पॉन्सर्स करत आहे. भाजपच या गटाला पैसा पुरवत आहे, दिल्लीतून पैसा येतोय. दोन महिनेच झालेत यांना, अजून यांचा पक्ष नाही, संघटनेची नोंद नाही, अधिकृत मान्यता नाही. तरीही अशा पद्धतीने पैसा खर्च केला जातोय, तो कोठून येतो, असे म्हणत भाजपकडूनच शिंदे गटाला रसद पुरवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना अशी धारणा आमची आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असल्याची धारणा राष्ट्रवादीसह महाराष्ट्राच्या जनतेची आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातही तीच भावना आहे. न्यायालयानेही शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास ठाकरेंना परवानगी दिली आहे. त्यामुळे, कुठेतरी वेगळा दसरा मेळावा घेऊन लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे.