मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयामुळे बॅँका व एटीएमच्या रांगेत उभे राहून सामान्य जनता वैतागलेली असताना, पश्चिम उपनगरातील एका पोलीस हवालदाराने ‘वर्दी’चा धाक दाखवीत रांग मोडून एटीएममधून पैसे काढल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याबाबतची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याला विरोध करणाऱ्या नागरिकांना त्याने दरडाविल्याचे स्पष्ट दिसत असल्याने त्याच्या या कृतीवर टीकेची झोड उठली आहे. हा उद्दामपणा कुरार पोलीस ठाण्यातील हवालदार महेश गोसावी याने केला . या प्रकरणाची पोलीस उपायुक्तांकडून चौकशी करण्यात येत आहे. १४ डिसेंबरला रात्री दहाच्या सुमारास मालाडच्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कुरार शाखेतील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी लोक रांगेत उभे होते. त्या वेळी हवालदार गोसावी या ठिकाणी मोटारसायकलवरून आला. गाडी पार्क करून थेट बँकेच्या एटीएममध्ये शिरण्याचा प्रयत्न करू लागल्यानंतर एकाने त्याला रांगेत उभे राहण्यास सांगितले. त्यावर गोसावींनी अरेरावी करत काय करायचंय ते करा, मी कोणाला घाबरत नाही, असे दरडावत एटीएममध्ये शिरला. या प्रकाराचे रांगेत उभ्या असलेल्या एका तरुणाने मोबाइलमध्ये चित्रण केले. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसाच्या या कृतीबद्दल संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे असे कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लिंबन्ना व्हनमाने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
एटीएमची रांग मोडून पोलिसाने काढले पैसे
By admin | Published: December 27, 2016 2:02 AM