- मनीषा म्हात्रे मुंबई : नवीन शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी घेतलेल्या १४ कोटींतून थकीत कर्ज फेडल्याचा ठपका आंध्र प्रदेशच्या रवींद्र भारती शैक्षणिक संस्थेवर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, त्यांच्याविरुद्ध माटुंगा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.सुरक्षा रियॅल्टी लिमिटेड कंपनीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अकाउंटिंगचे काम करणारे पारस मेहता (३८) यांची फिर्याद नोंदविण्यात आली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, आर.बी.एस. ग्रुपच्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा राज्यांत १४० शाळा आहेत. शैक्षणिक संस्थेच्या विस्तारासाठी अन्य राज्यांतदेखील नवीन शाळा स्थापन करण्यासाठी, आर.बी.एस. ग्रुपचे अध्यक्ष मन्नेरू सुब्रमन्यम यांनी सुरक्षा रियॅल्टी लिमिटेड कंपनीला १०० कोटींच्या आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्या बदल्यात कंपनीने सदर संस्थेत ३० टक्के भागीदारी देण्यास सांगितले. मन्नेरु यांच्याकडून मान्यता मिळताच, २०१६ मध्ये ठरल्याप्रमाणे दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला.पहिल्या टप्प्यात १४ कोटींचे कर्ज आरबीएस ग्रुपला दिले. कर्ज घेतेवेळी आर.बी.एस. ग्रुपच्या मालकीच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर कंपनीचा हक्क सांगण्यासाठी मॉर्गेज डीड नोंदणीकृत करून त्यातील काही रक्कम कंपनीला देण्याचे आमिष दाखविले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी सदर कर्जातील रकमेतून त्यांची थकीत बिले भरली. शिवाय, कंपनीस बनावट इनवायसेस सादर करून, आर.बी.एस. ग्रुपचे शाळा, विद्यार्थी संख्या, मालमत्ता तपशिलात फेरफार करून त्यांनी फसवणूक केल्याचा आरोप सुरक्षा रियॅल्टी कंपनीने केला आहे.>सखोल चौकशी सुरूसुरुवातीला याबाबत त्यांनी वारंवार मन्नेरु तसेच संस्थेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर गेल्या आठवड्यात कंपनीने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून सखोल चौकशी हाती घेण्यात आल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोईटे यांनी दिली.
'त्या' पैशातून फेडले थकीत कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 5:30 AM