आरोपी यश ठाकुर उर्फ अरविंद कुमारचा शोध सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोर्नोग्राफीतून मिळणारे कोट्यवधी रुपये या प्रकरणातील पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी यश ठाकुर उर्फ अरविंद कुमार श्रीवास्तवने पत्नी आणि वडिलांच्या खात्यात ट्रान्सफर केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. गुन्हे शाखेने त्याच्या पत्नीच्या खात्यातील २ कोटी ३० लाख रुपये गोठविले आहेत.
याप्रकरणात फेब्रुवारीमध्ये सुरतमधून अटक केलेल्या तन्वीर हाश्मीच्या चौकशीतून ठाकुरचे नाव समोर आले होते. ठाकुर याचे पोर्न चित्रपटाचे शूटिंग मुंबईतील मढसह लोणावळा आणि सुरतमध्ये भाड्याने बंगले घेत सुरू होते, अशीही माहिती समजते आहे. तसेच ठाकुर हा नेहमी ऑनलाईन व्यवहार करत होता. त्यामुळे गुन्हे शाखा सध्या त्याच्याही व्यवहाराची माहिती घेत आहे. सुरुवातीला यश आणि अरविंद कुमार वेगवेगळ्या व्यक्ती असल्याचे पोलिसांना वाटले होते. पुढे तपासात अरविंद कुमार हाच यश ठाकुरचे नाव वापरून वावरत असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने त्याचा शोध सुरू केला. त्याच्या विरूद्ध लूक आऊट नोटीसदेखील जारी करण्यात आली आहे.
याच दरम्यान ठाकुरने त्याची पत्नी हर्षिताच्या कानपूरमधील खात्यात कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केल्याचे समजले. त्यानुसार गुन्हे शाखेने तिच्या खात्यातील २ कोटी ३२ लाख ४५ हजार २२२ रुपये गोठविले आहेत. सहा वर्षांपूर्वी पंजाब नॅशनल बँकेत हे खाते उघडण्यात आले होते. अरविंद त्याचे वडील नर्वदा श्रीवास्तव यांच्याही बँक खात्यात कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करायचा. अरविंद अॅपमधून कमावलेले पैसे आपल्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात का ट्रान्सफर करायचा? याबाबत सध्या तपास सुरू आहे.
संबंधित बँक खात्यांचा उपयोग हा सट्टेबाजी किंवा काळा पैसा वळवण्यासाठी करण्यात आल्याचा अंदाज सुत्रांनी वर्तवला आहे. हर्षदा आणि नर्वदा यांच्या बँक खात्यात पैसे आल्यानंतर काही दिवसांनी ते पैसे वेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले जायचे. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर अरविंदच्या बँक खात्यातील १ कोटी ८१ लाख रुपये गोठविण्यात आले आहेत.
अरविंद हा अमेरिकास्थित फ्लीझ मुव्हीज कंपनीचा मालक आहे. या कंपनीअंतर्गत मॉडेल्स, अभिनेत्रींकडून मालिका, वेबसिरीजच्या नावाखाली करार बनवून घेण्यात येत होते. कुंद्रा याच्या कंपनीद्वारे जे पोर्न चित्रपट तयार होत होते ते अरविंदच्या कंपनीद्वारे वेबसाईटवर अपलोड करण्यात येत असल्याचा आरोप आहे. कंपनीचे पहिले नाव न्यूफ्लिक्स होते. गुन्हे शाखेने आतापर्यंत ठाकुरच्या बँक खात्यातील साडेचार कोटी रुपये गोठविले आहेत.
मृत व्यक्तीच्या नावाचा वापर
अरविंद कुमार श्रीवास्तव उर्फ यश ठाकुरने अटक टाळण्यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी २५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप केला होता. लाच द्यायला नकार दिल्याने या प्रकरणात मला अडकवण्यात आले, असे त्याचे म्हणणे आहे. दरम्यान, अरविंद जे ‘यश ठाकुर’ नाव वापरायचा त्या व्यक्तीचे २०२०मध्ये इंदूरमध्ये ब्रेन ट्युमरने निधन झाले असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.