कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ : शिल्पा शेट्टीच्या घरात झाडाझडती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आणि साथीदार रायन थॉर्पच्या पोलीस कोठडीत शुक्रवारी न्यायालयाने २७ जुलैपर्यंत वाढ केली आहे. यातच एका ऑनलाइन बेटिंग खेळणाऱ्या कंपनीच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम कुंद्राच्या बँक खात्यात जमा झाल्याचे समोर आले आहे. पोर्नोग्राफीतील पैसे या कंपनीमार्फत तो वळवून घेत होता की ऑनलाइन बेटिंगद्वारे त्याच्या खात्यात पैसे जमा होत होते, याबाबत गुन्हे शाखा तपास करत आहे, तर दुसरीकडे गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरीही झाडाझडती सुरू केली आहे.
कुंद्रा आणि रायन थॉर्पने पोर्न फिल्म उद्योगात कमावलेला पैसा बेटिंगमध्ये वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे राज कुंद्राचे येस बँक आणि युनियन बँक ऑफ आफ्रिका या दोन बँकेतील अकाउंटमधील व्यवहाराची पडताळणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीत, कुंद्राच्या येस बँकेमध्ये ऑनलाइन बेटिंग आणि कसिनो गेमिंग करणाऱ्या मरक्युरी इंटरनॅशनल कंपनीच्या युनायटेड बँक ऑफ आाफ्रिका या खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे आल्याचे दिसून आले. त्यामुळे कुंद्रा हा हॉटशॉट ॲपद्वारे कमावलेले पैसे इंटरनॅशनल कंपनीमार्फत अथवा ऑनलाइन बेटिंगद्वारे प्राप्त करतो असे तपासात समोर आले आहे. या खात्याच्या तपासणीची मागणी न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यानुसार चौकशी करण्यात येणार आहे.
कुंद्राचे वकील म्हणे ते पोर्न नाही !
कुंद्रा याचे वकील आबाद पोंडा युक्तिवाद करताना म्हणाले की, राज कुंद्रा यांनी निर्माण केलेल्या कंटेंटला कायदेशीर भाषेत पोर्न म्हणता येणार नाही. फक्त हा कंटेंट अश्लील प्रकारामध्ये मोडतो. यामुळे राज कुंद्रा यांच्यावर कारवाईदरम्यान माहिती तंत्रज्ञान कायद्यांअंतर्गत कलम ६७ अ चुकीच्या पद्धतीने लावले आहे. भारतीय दंडसंहितेनुसार अश्लील साहित्य पाठविण्यासंदर्भात गुन्ह्यांमध्ये हे कलम लावले जाते. तसेच प्रत्यक्ष शरीरसंबंध ठेवतानाचे चित्रीकरण केल्यास ते कायदेशीर भाषेत पोर्न असे म्हटले जाईल, असाही युक्तिवाद पोंडा यांनी यावेळी केला.
पुरावे नष्ट केल्याप्रकरणी कलमात वाढ
कुंद्रा यांच्या सांगण्यावरून पुरावे नष्ट केल्याचे समोर येताच, दाखल गुह्यांत पुरावे नष्ट केल्याप्रकरणी कलम २०१ची वाढ करण्यात आली आहे.