Join us

‘गोल्डन अवर्स’मुळे बँक खात्यात पैसे आले रिटर्न...; तांत्रिक पुराव्यामुळे पैसे वाचविण्यात मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:21 IST

खात्यातून पैसे गेल्याचे समजताच तासाभराच्या आत संपर्क साधल्यास पैसे वाचण्याची शक्यता जास्त असते. 

मुंबई : बँक केवायसी, नोकरी, ऑनलाईन खरेदी-विक्रीसह विविध सायबर फसवणुकीच्या जाळ्यात अडकून मुंबईकरांचे बँक खाते रिकामे होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. तथापि, ‘गोल्डन अवर्स’मुळे त्यांचे लाखो रुपये पुन्हा खात्यात आणण्यास पोलिसांना यश आले आहे. खात्यातून पैसे गेल्याचे समजताच तासाभराच्या आत संपर्क साधल्यास पैसे वाचण्याची शक्यता जास्त असते. 

सायबर सेलच्या कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, फसवणुकीमध्ये तीन टप्प्यांत काम चालते. सध्या फसवणुकीची रक्कम खात्यात जमा होताच, त्याच वेळेत दुसरीकडे काढण्यास सुरुवात होते, तर काही प्रकरणांत विविध शॉपिंग संकेतस्थळावर खरेदीसाठी पैसे अडकवले जात असल्याचे आतापर्यंतच्या कारवाईतून दिसून येत आहे. अनेकदा पैसे काढण्यासाठी असलेली लिमिट, ऑनलाइन ट्रान्सफर प्रक्रियेमुळे पैसे काढण्यास वेळ जातो. यापूर्वीच तक्रारदार पोलिस ठाण्यास आल्यास तत्काळ तांत्रिक पुराव्याच्या मदतीने संबंधित बँकेशी संपर्क साधून पैसे वाचविण्यास मदत होते.

...अशी होते कार्यवाही-तक्रारदाराने पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर सायबर पथकाकडून संबंधित खाते तपासले जाते. ती रक्कम कुठल्या बँकेत वळती झाली याची माहिती घेतली जाते. -ज्या खात्यात पैसे गेले त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून खात्याची माहिती घेत, खात्यात रक्कम शिल्लक असल्याचे समजताच फ्रीज्ड करण्यात येते. बँकेशी पाठपुरावा करून ती तक्रारदाराच्या खात्यात पुन्हा मिळवून देतात.

‘बी’चा ‘डी’ झाला अन्...ओशिवरा परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ गीतकाराने सोहम रॉक स्टार इंटरटेनमेंट वर्सोवा कंपनीसोबत गाण्यांचे साडेएकवीस लाख रुपये देण्याचा करार केला. कराराचे पैसे देण्याबाबत गीतकाराच्या कंपनीकडून ई-मेलद्वारे इन्व्हाईस पाठवले होते.

ठगाने याच ई-मेलमध्ये ‘बी’चा ‘डी’ करून संबंधित कंपनीला पाठवून दुसऱ्याच खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. कंपनीने विश्वास ठेवून पैसे ट्रान्सफर केले. 

पैसे न मिळाल्याने गीतकाराच्या अकाउंटच्या तक्रारीवरून पथकाने तपास सुरू केला. पैसे ट्रान्सफर झालेल्या खात्यात ११ लाख असल्याचे समजताच ते खाते गोठवत ती रक्कम परत मिळवून दिली. तसेच पथकाने फिल्मी स्टाइलने आरोपीलाही जेरबंद केले होते.

 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसबँकसायबर क्राइम