Join us

शेतकऱ्यांच्या खात्यात १५ ऑगस्टपूर्वी येणार पैसा; नियमित पीककर्ज भरणाऱ्यांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 7:23 AM

पोकरा योजना प्रत्येक गावात सुरू करणार

मुंबई : नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचे प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जमाफीतील उर्वरित रक्कम १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली.

सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम २६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुंडे यांनी कृषी योजनांचा आढावा घेताना विविध आश्वासने दिली. यासाठी पुरवणी मागण्यात आवश्यक तरतूद करण्यात आल्याचेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. या निर्णयामुळे स्वातंत्र्यदिनापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

काय होती समस्या?

ई-केवायसी होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली आहे. तसेच नियमित कर्जमाफी करणाऱ्या निम्म्या शेतकऱ्यांना अद्याप प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नसल्याचे सांगत तातडीने हे प्रश्न सोडविण्याची मागणी आमदारांनी केली होती.  

शेतीसाठी फायदेशीर योजना

शेतीसाठी फायदेशीर ठरलेली पोकरा योजना प्रत्येक गावात लागू व्हावी, यासाठी पोकराचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येत आहे. प्रत्येक गावातील शेतकऱ्यापर्यंत योजनेची व्याप्ती पसरावी, असा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही मुंडे म्हणाले. 

‘जलयुक्त’मध्ये आणखी ५ हजार गावे 

राज्यात जलयुक्त शिवार टप्पा दोनच्या माध्यमातून आणखी ५ हजार गावांचा समावेश करण्यात येत आहे. जलपातळी वाढण्यास नक्कीच याची मदत होईल. मराठवाड्यातील वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पूर्णत्वास प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :धनंजय मुंडेशेतकरी