पैसा झाला मोठा, पक्ष झाला छोटा..!
By अतुल कुलकर्णी | Published: May 26, 2018 02:07 AM2018-05-26T02:07:00+5:302018-05-26T16:16:26+5:30
विधान परिषद निवडणूक : राष्ट्रवादीत कोणालाच सुरक्षित का वाटेना?
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत बीड, लातूरमध्ये ३५ कोटी, हिंगोली-परभणीत १० कोटी, कोकणात, नाशिकमध्ये जवळपास १५ कोटी खर्च झाल्याचे आकडे बाहेर येत आहेत. खरे खोटे त्यांनाच माहिती, पण पक्षापेक्षा पैसा मोठा झाला. त्यामुळे पक्ष गुंडाळून प्रत्येकाने आपापली सोय पाहून डाव साधला. सहापैकी पाच जागांच्या निकालाने पक्षीय फायद्या-तोट्यापेक्षा चक्रावून टाकणारी वस्तुस्थिती समोर आणली आहे.
नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्याच उमेदवाराचा पराभव केल्याचे बोलले जाते. शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी विजयी होताच भुजबळांचे आभार मानले! राष्टÑवादीचे शिवाजी सहाने यांनी आपल्याला दिलेला त्रास आपण विसरलो नाही, हे भुजबळांनी दाखवून दिले. मुंबईत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भुजबळांची भेट घेतली. मग त्यांच्याच फोनवरुन भुजबळांनी नाशकात अनेक फोन केले, परिणामी सहाने यांचा पराभव झाल्याचे बोलले जात असताना त्याचे खंडन ना भुजबळांनी केले ना राष्ट्रवादीने. नाशिकमध्ये भाजपाने सेनेच्या विरोधात काम करण्याच्या सूचना दिल्यानंतरही शिवसेना निवडून आली.भुजबळ शिवसेनेत जातील, असा याचा अर्थ नसला तरी तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी आपले राजकारण सुरू केले आहे.
विदर्भात अमरावती आणि चंद्रपूर-वर्धा अशा दोन जागा भाजपाने लढवल्या. अमरावतीत राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी सगळ्यांची मते घेऊ न विजय मिळवला. काँग्रेस व नेतृत्वाने केलेले दुर्लक्ष, उमेदवाराने लक्ष्मीदर्शनास दिलेला नकार यामुळे पक्षाची अप्रतिष्ठा झाली. हक्काची १२८ मते असताना त्यांना फक्त १७ मते मिळाली. चंद्रपूरची उमेदवारी रामदास अंबटकर यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. स्वत: सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासाठी ठाण मांडले. तेथे काँग्रेस, राष्टÑवादीची मते ३६९ एवढीच असताना ते ४९३ मते मिळवतात आंबटकर केवळ ३५ मतांनी विजयी झाले. ३६ मते बाद होणे, ही भाजपासाठी चिंतेची बाब आहे की गडकरी गटासाठी याचे उत्तर शोधावे लागेल.
कोकणात सुनील तटकरे यांनी मुलगा अनिकेत यांना विजयी करुन घरातल्या आणखी एका सदस्याला राजकारणात आणले. आता त्यांच्या घरात आणखी कोणी शिल्लक असेल तर त्यांनाही पुढच्या वेळी उभे करा, नंतर आमचा विचार करा, अशी टीका राष्ट्रवादीतूनच सुरू झाली. राष्टÑवादीविषयी त्यांच्याच पक्षातल्या लोकांना प्रेम वाटेनासे झाल्याची अनेक उदाहरणे या काळात घडली. निरंजन डावखरे यांनी आ. जितेंद्र आव्हाड आपल्याला त्रास देतात, ते विरोधात काम करतात, अशी तक्रार शरद पवार यांच्याकडे करुनही काहीच झाले नाही. त्यामुळे ते भाजपाकडे गेले. परभणी-हिंगोलीत बाबा जानी दुर्रानी राष्टÑवादीचे विद्यमान आमदार होते. निवडून येण्याएवढे संख्याबळही त्यांच्याकडे होते. तरीही त्यांची जागा राष्टÑवादीने काँग्रेसला दिली.
ज्येष्ठ नेत्यांनाच कात्रजचा घाट?
बीड, लातूरमधून रमेश कराड यांना ज्या पद्धतीने भाजपातून राष्टÑवादीत घेतले गेले, नंतर कराडांनी अर्ज मागे घेत राष्टÑवादीला तोंडावर पाडले. कराड यांना पक्षात घेण्याचा आग्रह धरणारे अमरसिंग पंडीत, जगजित सिंह राणा यावर काहीच बोलायला तयार नाहीत. शरद पवार यांच्याच घरुन रमेश कराड यांना अर्ज भरण्याचा फोन गेला, मात्र तो कोणी केला याचाही शोध लागत नाही. जी काही राजकीय खेळी खेळली गेली त्यात धनंजय मुंडे, पंडीत किंवा राणा पाटील यांचीच राजकीय कोंडी झाली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवार यांनाच कात्रजचा घाट दाखवला असाच अर्थ निघत आहे. अत्यंत धूर्त अशी ही खेळी देशाचे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना कशी कळाली नाही, याचीच चिंता राष्टÑवादीला आहे.
केवळ आघाडी करून विजय कसा मिळणार?
नात्यागोत्याच्या पलिकडे राष्टÑवादी पक्ष जायला तयार नाही, काँग्रेसमध्ये ‘मी आणतो तुम्हाला निवडून’ अशी जबाबदारी घेण्याची कोणाची मानसिकता उरलेली नाही, अशा स्थितीत नुसते दोन्ही काँग्रेस एकत्र आल्याचे दाखवून विजय कसा मिळणार?