- मनीषा म्हात्रे मुंबई : बळीराजाभोवती सावकारीचा फास आवळला जाण्याच्या घटनांनंतर आता आशिया खंडात सर्वाधिक मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांनाही सावकारीचा विळखा पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कुठलेही कर्ज घेतले नसताना पालिका कर्मचाऱ्यांच्या पगारांतून थेट पैसे ईसीएसच्या माध्यमातून सावकारांच्या खिशात जात असल्याचे दिसत आहे.कुर्ला पश्चिमेकडील ‘एल’ विभागामध्ये घनकचरा व व्यवस्थापन (एसडब्ल्यूएम) विभागातील दोनशेहून अधिक जण सावकारांच्या जाळ्यात अडकले आहेत. ‘लोकमत’च्या प्रस्तुत प्रतिनिधीने कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे चित्र समोर आले.
पैसे कुठे जातात? याबाबत चौकशी करताच हातात कोर्टाची नोटीस ठेवून अधिकारी वर्ग हात वर करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. आधीच तुटपुंजा पगार. त्यात हाती लागणाऱ्या रकमेवर घर कसे चालवायचे? असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ‘एल’ विभागात मोटर लोडर म्हणून काम करणारे सचिन बच्छाव सांगतात, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर २०१२ मध्ये नोकरी लागली.
सुरुवातीला वडिलांच्या नावे कर्जाची वसुली असल्याचे सांगून सावकाराने धमकावून पैशांची मागणी केली. त्यापाठोपाठ २०१३ पासून दरमहा खात्यातून ३ हजार रुपये वजा होण्यास सुरुवात झाली. याबाबत चौकशी करताच, कोर्ट वसुली असल्याचे सांगून अधिक माहिती देण्यास टाळले. न्यायालयात दाद मागितली. मात्र, तेथेही फक्त तारीख पे तारीख शिवाय हाती काही लागले नाही. पालिका आयुक्तांसह, एसडब्ल्यूएमकडे पाठपुरावा सुरू केला. चौकशी सुरू असल्याचे सांगून दुर्लक्ष होत आहे. पोलिसांकडूनही उडवाउडवीची उत्तरे देत माघारी पाठविण्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कुणाच्या खात्यातून ३ तर कुणाच्या खात्यातून २० हजार वजा
सचिन बच्छाव यांच्याप्रमाणेच कुणाच्या खात्यातून ३ हजार तर कुणाच्या खात्यातून १५ ते २० हजार रुपये हप्त्यांच्या स्वरूपात वजा होत आहेत. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेवरही सावकार मंडळी डल्ला मारत असल्याने, निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या काही जणांना पैसे मिळणार की नाही? याची धास्ती लागली आहे.
हजारो कर्मचारी वेठीला
एल वॉर्डच्या कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर समोर आलेले हे वास्तव आहे. इतर वॉर्डच्या कार्यालयांनाही सावकारीचा असा विळखा पडला आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटना आहेत.
बनावट कागदपत्रांचा आधार
काही जणांचे रात्री-अपरात्री कामावरून अपहरण करत सावकाराकडून धमकाहून, मारहाण करत कर्जासाठी सह्या घेतल्या जात आहेत. समोरच्या व्यक्तीला ओळखत नसतानाही त्यांच्याकडून कर्ज घेतल्याचे दाखवण्यात आले आहे. यामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन पैसे काढल्याची शक्यता असून चौकशी होणे गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
काय आहे प्रकरण?२०१७ पर्यंत ८५ जणांच्या खात्यातून कर्जाचे हप्ते म्हणून लाखो रुपये गेले. २०२२ पर्यंत ही संख्या २०० पेक्षा अधिक झाली आहे.एकाच्या नावावर दोन ते तीन कर्जे दाखवण्यात येत आहेत.