तक्रार दाखल नसतानाही सापडली मोनिका
By admin | Published: January 13, 2015 10:27 PM2015-01-13T22:27:05+5:302015-01-13T22:27:05+5:30
आश्रमात अनाथ म्हणून राहणा-या एका ११ वर्षीय मुलीला ठाणे पोलिसांच्या मदतीने तीन वर्षांनंतर पुन्हा मायेचे छत्र सापडले.
ठाणे : हरवल्याची कोणतीही तक्रार दाखल नसल्याने जळगाव आणि भिवंडी बालसुधारगृह असा प्रवेश करून ठाण्यातील अनाथ आश्रमात अनाथ म्हणून राहणा-या एका ११ वर्षीय मुलीला ठाणे पोलिसांच्या मदतीने तीन वर्षांनंतर पुन्हा मायेचे छत्र सापडले. मोनिका पांडे असे त्या मुलीचे नाव आहे.
डोंबिवलीतील अहिरे गावात राहणारी मोनिका ही ८ वर्षाची असताना अचानक गायब झाली. दरम्यान, ती चाळीसगाव रेल्वे स्थानकात पोलिसांना सापडली. तेथून तिची रवानगी जळगाव येथील बालसुधारगृहात झाली. तिच्याकडून मिळालेल्या तुरळक माहितीवरून तिला भिवंडीच्या सुधारगृहात पाठवले. त्यातच ती हरवल्याची नोंद कोणत्याच पोलीस ठाण्यात नसल्याने तिची अनाथ म्हणून नवीन ओळख निर्माण झाली. भिवंडी सुधारगृहातून ती ठाणे वर्तकनगर येथील दिव्यप्रभा या अनाथ मुलींच्या आश्रमात दाखल झाली. तेथे शिक्षणांचे धडे गिरवताना, अनाथ मुलांची माहिती गोळा करणारे ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनीट या आश्रमात धडकले. त्यावेळी पोलिसांनी मोनिकाशी चर्चा करताना तिने डोंबिवली आयरे गाव असे उद्गार काढले. याच माहितीवरून युनीटचे प्रमुख मदन बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक कमालउद्दीन शेख आणि पोलीस हवालदार प्रतिमा मणोरे, पो. ना. रोहिणी सावंत यांनी तपास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका रिक्षाचालकाच्या मदतीने तिचे घर गाठण्यात पोलिसांना यश आले. ती पालक बिगारी कामगार आहेत. यापूर्वीही ती हरवली असताना, मुंबई पोलिसांनी घरी आणून सोडल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)