ध्वनिप्रदूषणाचे मोजमाप होणार, हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश, मेट्रो ३ कामाच्या आवाजावर लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 03:57 AM2018-04-19T03:57:40+5:302018-04-19T03:57:40+5:30
मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी उच्च न्यायालयाने चर्चगेट, कफपरेड व माहिम येथील पोलिसांना येथील कामाच्या आवाजाची पातळी मोजण्याचे निर्देश बुधवारी दिले.
मुंबई : मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी उच्च न्यायालयाने चर्चगेट, कफपरेड व माहिम येथील पोलिसांना येथील कामाच्या आवाजाची पातळी मोजण्याचे निर्देश बुधवारी दिले.
ध्वनिप्रदूषषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर, न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती.
कुलाबा-अंधेरी-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पामुळे मुंबईतील ध्वनिप्रदूषणात वाढ झाली आहे, अशी माहिती आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने अब्दुलाली यांनी सुचविलेल्या माहिम, चर्चगेट आणि कफपरेड या तीन ठिकाणी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भेट देऊन, येथील आवाजाची पातळी मोजण्याचे निर्देश दिले.
पुढील आठवड्यात तिन्ही पोलीस ठाण्यांनी अहवाल सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.
दरम्यान, गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणासंदर्भात तक्रार करणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त राखण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करत, राज्य सरकारने यासंबंधी परिपत्रक काढून, एका महिन्यात राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यांना तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवण्याचा आदेश देऊ, असे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २५ एप्रिल रोजी ठेवली आहे.