Join us

बंदर आधारित जेएनपीटी सेझ अखेर कार्यान्वित; देशातील पहिलेच बंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 1:02 AM

चार हजार कोटींची गुंतवणूक आणि ५७ हजार रोजगार निर्मिती

- मधुकर ठाकूर उरण : जेएनपीटीने नवी मुंबई येथील मालकीच्या २७७ हेक्टर क्षेत्रात विकसित करण्यात आलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रात (सेझ) अखेर प्रत्यक्षात आॅपरेशनच्या कामाला सुरुवात झाल्याने देशातील बंदर आधारित जेएनपीटी सेझचा विकास करणारे हे देशातील पहिलेच बंदर ठरले आहे. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जेएनपीटी सेझ अखेर कार्यान्वित झाला असून यात सुरु वातीला चार हजार कोटींची गुंतवणूक आणि ५७ हजार रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

केंद्रीय नौकानयन मंत्रालयाच्या सागरमाला उपक्रमांतर्गत बंदर आधारित औद्योगिकीकरण सक्षम करून निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने या बहु-उत्पादन बंदर आधारित सेझचा विकास केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आॅगस्ट २0१४ मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. जेएनपीटी सेझमधील दोन कंपन्या, मेसर्स ओडब्ल्यूएस एलएलपी आणि मेसर्स क्रि श फूड इंडस्ट्री (इंडिया) यांनी आपल्या पहिल्या टप्प्यातील कार्य पूर्ण केले आहे. तसेच विकास आयुक्त, सीप्झ (एसईईपीझेड), एसईझेड यांनी या कंपन्यांनी कार्य सुरू केल्याचे घोषित केले आहे.

कोविड - १९ च्या आव्हानात्मक काळात या कंपन्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. पहिल्या दोन कंपन्यांव्यतिरिक्त आणखी तीन कंपन्या लवकरच त्यांचे बांधकाम सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहितीही सेठी दिली आहे. हा जेएनपीटी सेझचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात आल्यानंतर जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी जेएनपीटीसाठी हा क्षण अत्यंत गौरवशाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सेझमध्ये जेएनपीटी पायाभूत सुविधांचा विकास आंतरराष्ट्रीय मानदंडानुसार करीत आहे.

आजवर १९ एमएसएमई आणि एक मुक्त व्यापार वेअरहाउसिंग झोन सह- विकसकांना जेएनपीटी सेझमध्ये भूखंड देण्यात आले. जेएनपीटीला अपेक्षा आहे की, उर्वरित सर्व युनिटसुद्धा नजीकच्या भविष्यात याचे अनुसरण करीत कार्यान्वित होतील. गेल्या काही महिन्यांपासून जेएनपीटी सेझच्या यशस्वी परिचालनासाठी सातत्याने काम करीत आहे.

जगातील नामांकित कंपन्यांकडून गुंतवणूक

संभाव्य गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीमुळे जेएनपीटी परिसरातील संपूर्ण इको सिस्टिमला चालना मिळेल, असा विश्वास संजय सेठी यांनी व्यक्त केला. जेएनपीटी सेझचे कार्य पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनविण्यासाठी जगातील नामांकित कंपन्या येथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतील.

टॅग्स :जेएनपीटी