Join us

अन्न, निवारा व प्रजननासाठी प्रतिकूल वातावरणामुळे मानवी वस्तीत माकडांचा अधिवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 2:40 AM

प्रेमापोटी वन्यप्राण्यांना कोणत्याही प्रकारे खाद्य देण्यात येऊ नये.

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे कॉलनी येथील माकडे ही हळूहळू मानवी वस्तीमध्ये येऊन धुमाकूळ घालत असल्याची तक्रार नागरिक करतात. मानवी वस्तीमध्ये माकडांना अन्न, निवारा आणि प्रजननासाठी प्रतिकूल वातावरण मिळत असल्यामुळे त्यांनी आपले बस्तान घरांच्या छप्परावर व इमारतींमध्ये मांडले आहे. परंतु एकीकडे नागरिक त्यांना अन्न देतात आणि दुसरीकडे माकडे त्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी करतात, यामध्ये नागरिकांचेही चुकत आहे. माकडांना कोणत्याही प्रकारचे खाणे देऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

कांदिवली पूर्वेकडील ठाकूर व्हिलेज येथील एव्हरशाईन व्हॅली टॉवर्स या इमारतीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून माकडांचा अधिवास आहे. जवळपास तीन ते चार माकडे या इमारतीमध्ये वावरताना दिसतात. इमारतीतील रहिवाशांना माकडे त्रास देत असल्याची तक्रार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडे करण्यात आली. उद्यान प्रशासनाचे अधिकारी मंगळवारी इमारतीमध्ये दाखल झाले होते. त्या वेळी त्यांना असे दिसून आले की, इमारतीमधील रहिवासी माकडांना गाजर, काकडी, बटाटे इत्यादी खाद्य देतात. या वेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी इमारतीच्या अध्यक्षांना व सदस्यांना काही सूचना व माकडांना पळवून लावण्यासंबंधी माहिती दिली.जोगेश्वरी पूर्वेकडील नटवर नगर रोड क्रमांक ५ येथे स्वामी समर्थ मठाच्या परिसरात माकडांनी धुमाकूळ घातला आहे. तसेच या ठिकाणी बºयाच गृहनिर्माण सोसायट्यांच्या छतावर किंवा खिडक्यांवर माकडे येतात. काही रहिवासी माकडांना खायलादेखील देतात. त्यामुळे आता ही माकडे दररोज यायला लागली आहेत. आरेतील झाडे तोडल्यामुळे माकडे येऊ लागली आहेत. पूर्वी अशा प्रकारची माकडे कधी सोसायटीमध्ये येत नव्हती, असे येथील रहिवासी सांगतात. काही रहिवाशांना या माकडांचा त्रास होऊ लागला आहे. तर माकडांना पकडून पुन्हा जंगलात सोडून द्यावे, अशी मागणी रहिवासी करीत आहेत.प्रेमापोटी वन्यप्राण्यांना कोणत्याही प्रकारे खाद्य देण्यात येऊ नये. कारण त्यांना एकदा चांगल्या खाद्याची सवय लागली, तर ते जागा सोडत नाहीत. माकडे ही आपला मूळ अधिवास सोडून मानवी वस्तीमध्ये येत राहतात. त्यामुळे वन्यप्राणी-मनुष्य असा संघर्ष वाढू शकतो.- डॉ. शैलेश पेठे, पशुवैद्यकीय अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान.

टॅग्स :मुंबईमाकड