वानर सेनेचा रेल्वेला पुणेरी कल्चरल टच
By Admin | Published: March 2, 2016 02:45 PM2016-03-02T14:45:00+5:302016-03-02T20:42:30+5:30
पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या मागच्या बाजूला असलेल्या सुरक्षाभिंतीचा कायापालट करण्यात आला आहे.
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. २ - पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या मागच्या बाजूला असलेल्या सुरक्षाभिंतीचा कायापालट करण्यात आला आहे. या भिंतीवर आता तुम्ही नजर टाकाल तर, तुम्हाला पुणेरी संस्कृतीचं दर्शन घडेल. वानर सेना या ग्रुपने पुणेकरांच्या मदतीने या भिंतीचा कायापालट केला.
५ हजार स्केवअर फीटच्या या भिंतीवर ट्रेनच चित्र काढण्यात आलं असून, या ट्रेनला 'पुणे सांस्कृतिक एक्स्प्रेस' असं नावही देण्यात आलं आहे. ट्रेनच्या प्रत्येक डब्ब्यावर पुणेरी संस्कृतीचे दर्शन घडवणारी चित्र रेखाटण्यात आली आहेत. वानर सेना या ग्रुपने इंडिगो पेंट्सच्या सहाय्याने हा उपक्रम राबवला आहे.
या उपक्रमात २५० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणा-या पुणे शहराची संस्कृती दाखवणारी चित्रं या भिंतीवर रेखाटण्यात आली आहेत.
यामध्ये गणपती उत्सव, पेशवे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व गणितज्ज्ञ डॉ जयंत नारळीकर, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पुण्यातील वाडे यांची चित्रं रेखाटण्यात आली आहेत. पुणे सांस्कृतिक एक्स्प्रेसद्वारे स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार करत आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे.