मुंबई : जगात कोरोनानंतर आता एक नवीन संसर्ग वेगाने पसरत आहे, ज्याचे नाव 'मंकीपॉक्स' (Monkeypox) आहे. ताज्या अहवालानुसार, आतापर्यंत जगभरात मंकीपॉक्सचे 90 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण यूके, युरोपियन देश, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह 12 देशांमध्ये आढळून आले आहेत. मात्र, भारतात अद्याप एकही केस आढळलेला नाही. दरम्यान, मंकीपॉक्स व्हायरसबाबत मुंबईविमानतळ आणि मुंबई महापालिका सतर्क आहे.
यासंदर्भात मुंबई महापालिकेने आदेश जारी करताना म्हटले आहे की, ज्या लोकांनी आफ्रिकन देश आणि इतर देशांतून प्रवास केला आहे, जेथे मंकीपॉक्सची लक्षणे आढळली आहेत, त्या लोकांची चाचणी करणे आवश्यक आहे. मुंबई विमानतळालाही प्रवाशांची तपासणी करण्यास सांगितले आहे. दरम्यान, यापूर्वी केंद्र सरकारने 'नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल' आणि 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' यांना मंकीपॉक्सबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच, मंकीपॉक्स व्हायरसबाबत महाराष्ट्रात राज्य सरकारने देखील अॅडव्हायझरी जारी केली आहे.
मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत?तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय, ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.
कसा वाढतो संसर्गाचा धोका?संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील मंकीपॉक्स पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये मंकीपॉक्सची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.
कुठे आढळले रुग्ण? मंकीपॉक्सचे रुग्ण अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन, पोर्तुगाल, स्वीडन, कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांत आढळले आहेत. आतापर्यंत 90 हून अधिक रुग्ण या देशांमध्ये सापडले आहेत. सुदैवाने तूर्त तरी भारतात या आजाराचा एकही रुग्ण नाही.