माकडांना पकडण्यासाठी वनविभागाने बसविले पिंजरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू परिसरातील पेडर रोड येथील इमारती, सोसायटी आणि लगतच्या परिसरात माकडांनी मांडलेला उच्छाद अजूनही कायम आहे. वनविभागाने येथील माकडांना पकडण्यासाठी पिंजरे बसविले असले तरी स्थानिक नागरिकांकडून माकडांना खाद्यपदार्थ सेवन करण्यास दिले जात असल्याने माकडांना पकडणे कठीण होत आहे. त्यामुळे माकडांना खाद्य पदार्थ देऊ नयेत, अशी विनंती वनविभागाने स्थानिकांना केली आहे. शिवाय दोन दिवसांत येथे बसविण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये माकड सापडले नाही तर वन विभागाची टीम पुन्हा एकदा पेडर रोड येथील घटनास्थळाची पाहणी करत कारवाईसाठी पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील हिरवळीचे अथवा जंगलांचे प्रमाण कमी होत असले तरीदेखील आजही येथे माकडांचे वास्तव्य आहे. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील झाडे असलेल्या परिसरासह मनुष्य वस्तीमध्ये माकडांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळून येते. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक वस्तीमधील नागरिकांना याचा त्रास होऊ लागला आहे. चाळी असो, इमारती असो अथवा मोठ्या सोसायटी असो. अशा लोकवस्तीमध्ये माकडांचे प्रमाण वाढत आहे. इमारतींच्या खिडक्यांच्या परिसरात येणे. वाहनांच्या खिडक्यांतून आत पाहणे किंवा इमारती, चाळी, झोपड्या या परिसरातून माकडांचा उच्छाद वाढला आहे. याचा स्थानिकांना त्रास होत असून त्यासंदर्भातील तक्रारी देखील सातत्याने वाढत आहेत.
माकडांनी जो उच्छाद मांडला आहे यावर उपाय म्हणजे त्यांना खाद्यपदार्थ सेवन करण्यास देऊ नये. कारण माकडांना खाद्य पदार्थ आयते उपलब्ध होत असल्याने साहाजिकच मनुष्यवस्ती मधील अनेक ठिकाणी माकडे येण्याचे प्रमाण वाढत असते. परिणामी कटाक्षाने आपण नियमांचे पालन केले तर सहाजिकच अशा प्रकारचा त्रास होणार नाही, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात उच्छाद मांडलेल्या माकडांना ताब्यात घेऊन जंगलात सोडले तरी देखील ते पुन्हा शहरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्राणी अभ्यासकांनी सांगितले.
--------------------------------
माकड, मुंबई आणि जंगल...
माकडाला पकडणारी टीम एखाद्या परिसरात दाखल झाली तर सावध झालेले माकड एवढ्या उंचीवर जाऊन बसते की त्याला पकडणे कठीण होऊन बसते. शिवाय पकडलेल्या माकडाला जंगलात नेऊन सोडले तरी देखील ते तेथे पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणजे माकडांच्या टोळीमधील जो मुख्य नर आहे त्याला पकडून जंगलात सोडले तर साहजिकच उर्वरित माकडे सहज त्यादिशेने फिरतील आणि त्यांची शहरात परतण्याची शक्यता कमी असेल. मात्र हे प्रमाण फारच कमी आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली.
--------------------------------
मुंबई शहर आणि उपनगरातून माकडाबाबत तक्रार आली तर आम्ही कारवाई करतो. पेडर रोड येथे माकडांचा उच्छाद सुरू आहे. याबाबत तक्रार दाखल झाली आहे. येथील तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही येथे पिंजरा देखील बसविला आहे. याव्यतिरिक्त आमच्या कर्मचाऱ्यांनी येथे भेट देखील दिली आहे. मात्र होते असे की येथील परिसर असो अथवा सोसायटी असो; येथील नागरिकांकडून माकडाला खाद्य दिले जाते. केळी देणे किंवा खाद्य पदार्थ देणे अशा गोष्टी केल्या जातात. त्यामुळे सातत्याने माकडांचा येथे उच्छाद असतो. मात्र आता आम्ही येथील सोसायटी आणि परिसरातील नागरिकांना असे सांगितले आहे की माकडांना अशा प्रकारचे खाद्यपदार्थ टाकू नये. अशाने होणारा त्रास वाढतच जातो. येत्या दोन दिवसात येथील पिंजऱ्यामध्ये माकड नाही सापडले तर आम्ही पुन्हा एकदा घटनास्थळाला भेट देणार आहोत.
- वन विभाग
--------------------------------