मुंबई : केंद्राने आता मेट्रो सुरु करण्याबाबतही परवानगी दिली आहे. त्यानुसार, ७ सप्टेंबरपासून मेट्रो सुरु करता येईल. तत्पूर्वी मुंबई मेट्रो धावण्यासाठीची परवानगी राज्य सरकारच देणार आहे. आणि मेट्रो प्रमाणे मोनो रेल रुळावर येण्यासाठी देखील राज्य सरकारची परवानगी लागणार आहे.
तूर्तास मुंबईतल्या मेट्रो आणि मोनोला धावण्यासाठीची परवानगी मिळाली नसली तरी देखील मेट्रोसह मोनोच्या देखभाल दुरुस्तीचे काम वेगाने सुरु आहे. विशेषत: मोनो रेलची देखभाल दुरुस्ती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून केली जात असून, मेट्रो आणि मोनो अशा दोन्ही रेल्वे धावण्यासाठी सज्ज असल्या तरीदेखील दोघीही परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबापुरीतल्या बेस्ट, लोकल, मेट्रोप्रमाणे मोनोरेलची सेवादेखील ठप्प झाली. चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणारी मोनोरेल थांबली. मोनोरेलची सेवा आजही बंदच आहे. मात्र ऐनवेळी जेव्हा मोनो प्रत्यक्षात धावू लागेल; तेव्हा मात्र प्रशासनासमोर ऐनवेळी अडचण येऊ नयेत. प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून मोनोरेलच्या देखभाल दुरुस्तीची कामे सुरु आहेत. मोनोरेलच्या देखभाल दुरुस्तीने आणखी वेग पकडला आहे. याच देखभाल दुरुस्तीच्या कामाचा एक भाग म्हणून मोनोरेलची चाचणी घेतली जात आहे.