मुंबई : चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर सुरू करण्यात आलेल्या मोनोरेलने आता चांगलाच वेग पकडला आहे. वाढत्या वाहतुकीच्या वेगाचा विचार करता आणि मुंबईकरांना अधिक वेगवान प्रवासाचा अनुभव देण्याकरिता प्राधिकरणाच्या वतीने मोनोरेलच्या ताफ्यामध्ये पुढीलवर्षी आणखी १० मोनोरेल दाखल होणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेला किमान एक वर्षे तरी लागणार असले तरी या मोनोला याच काळात भुयारी मेट्रो आणि पश्चिम रेल्वेलाही जोडले जाणार आहे.
एमएमआरडीच्या वतीने सुरुवातीला जेव्हा मोनोरेल सुरू करण्यात आली तेव्हा तिला प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. परिणामी, मोनोसारखा पांढरा हत्ती पोसणे प्राधिकरणाला जड जात होते. मात्र, मोनोचे वाहतुकीचे महत्त्व प्रवाशांच्या लक्षात आल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरून हार्बर मार्गावर जाण्यासाठी मोनोरेलमधून प्रवास होऊ लागला.
तिकिटाचे दर १०, २०, ३० आणि ४० रुपये असे आहेत. दरदिवशी ११,००० ते १२,००० किंवा त्यापेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. चेंबूर ते वडाळा हा मार्ग फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू झाला. वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा दुसरा टप्पा मार्च २०१९ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल. नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान २७.५ लाख प्रवाशांनी प्रवास केला.
अशी असेल मोनो मोनोरेलमधून एकावेळी ५६० प्रवासी प्रवास करणार देखभाल दुरुस्ती खर्च कमी मोनोरेलची बांधणी स्टेनलेस स्टीलने
दिवसाला मोनोरेलमधून एक लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करू शकतात.२०३१ पर्यंत ही संख्या २ लाख होईल. २०४१ पर्यंत हा आकडा ३ लाख होईल.