मोनो डेपोचा वापर आता निवासी, व्यावसायिक कारणांसाठी, एमएमआरडीएचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 03:57 AM2018-12-29T03:57:57+5:302018-12-29T03:58:09+5:30
चेंबूर ते जेकब सर्कलदरम्यान असलेला मोनोरेल प्रकल्प एमएमआरडीएने आता स्कोमी कंपनीकडून आपल्या ताब्यात घेतला आहे.
मुंबई : चेंबूर ते जेकब सर्कलदरम्यान असलेला मोनोरेल प्रकल्प एमएमआरडीएने आता स्कोमी कंपनीकडून आपल्या ताब्यात घेतला आहे. सोबतच होत असलेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी एमएमआरडीएने नवीन शक्कल लढवली आहे. त्यानुसार वडाळ्यातील मोनोरेल डेपोचा वापर एमएमआरडीए व्यावसायिक आणि निवासी वापरासाठी करणार आहे. यातून जमा होणाऱ्या महसुलाचा वापर मोनोरेल्वे प्रकल्पातील आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी होऊ शकतो, अशी माहिती एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अकार्यक्षम कारभारामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) काही दिवसांपूर्वीच मोनोचा कारभार स्कोमी कंपनीकडून काढून घेतल्यानंतर मोनो प्रकल्पाला आर्थिक संकटातून बाहेर काढून नवी उभारी कशी घेता येईल, यासंदर्भात आर. ए. राजीव यांनी वरिष्ठ अधिकाºयांची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत चर्चेअंती काही मुद्दे मांडण्यात आले. वडाळा येथे मोनोरेल डेपोमध्ये मुख्य बांधकाम वगळता एमएमआरडीएकडे ६.९ एकर जमीन रिकामी आहे. या रिकाम्या जागेवर व्यावसायिक आणि निवासी स्वरूपाचे बांधकाम करून ते भाडेतत्त्वावर दिल्यास त्यातून होणाºया उत्पन्नामुळे एमएमआरडीएला मोठा फायदा होऊ शकतो, यावर बैठकीत एकमत झाले. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार या रिकाम्या जागेवर एमएमआरडीए तीन मजली इमारत बांधणार आहे. यातील काही जागा एमएमआरडीएच्या अधिकाºयांना वास्तव्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उरलेली जागा ही व्यावसायिक कंपन्यांना भाडेतत्त्वावर देण्यात येईल, असे ठरले.
‘मोबाइल कंपन्यांना टॉवर उभारण्यास परवानगी’
मोनो प्रकल्पातील सर्व स्थानके, मोनोरेल्वेचे डबे, प्रकल्पादरम्यान येणारे खांब हे यापुढे व्यावसायिक जाहिरातदारांना भाड्याने देण्यात येणार आहेत. तसेच मोनोप्रकल्पांतील स्थानकांवर मोबाइल कंपन्यांना त्यांचे टॉवर उभारण्याचीही परवानगी देण्यात येईल. यामुळे एमएमआरडीएला अतिरिक्त उत्पन्न मिळणार असल्याची माहिती राजीव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.