Join us

शनिवारपासून प्रवाशांच्या सेवेत पुन्हा धावणाऱ्या मोनोचे भाडे दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 7:51 AM

फेब्रुवारी २०१९ पासून जेकब सर्कलपर्यंत धावणार

मुंबई : गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेली देशातील पहिली मोनोरेल येत्या १ सप्टेंबरपासून पुन्हा धावेल. मात्र, तिचे भाडे दुप्पट होणार आहे. सोबतच वडाळा ते जेकब सर्कल हा मोनोरेलचा दुसरा टप्पा २ फेब्रुवारी २०१९ पासून सुरू होईल. ‘मोनोरेलचा पहिला टप्पा आम्ही १ सप्टेंबरपासून सुरू करत आहोत. डिसेंबरपर्यंत वडाळा ते जेकब सर्कलपर्यंतच्या दुसºया टप्प्यावरील कामे पूर्ण केली जातील. त्यानंतर, जानेवारी २०१९ पर्यंत दुसºया टप्प्यातील मार्गावर मोनोरेलची ट्रायल रन घेण्यात येईल. आवश्यक त्या प्रकिया करून २ फेबुवारी, २०१९ पासून दुसरा टप्पाही कार्यान्वित होईल. दोन्ही टप्पे सुरू झाल्यावर प्रवाशांना चेंबूर ते सातरस्ता असा सलग प्रवास करता येईल,’ असे एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.

तांत्रिक बिघाडामुळे चेंबूर ते वडाळा दरम्यान धावणाºया मोनोच्या शेवटच्या डब्याला भक्ती पार्क स्थानकादरम्यान नोव्हेंबर, २०१७ मध्ये आग लागली. तेव्हापासून हा मार्ग बंद होता. त्यानंतर, सुरक्षेच्या अटी-शर्तींची पूर्तता करीत, आता पहिल्या टप्प्यातील मोनो १ सप्टेंबरपासून धावेल. लवकरच दुसरा टप्पा सुरू होणार असल्याने प्रवासी वाढतील, असा विश्वास एमएमआरडीएला आहे. पहिल्या टप्प्यातील मोनो १ सप्टेंबरपासून पुन्हा धावणार असली, तरी प्रवाशांना या मार्गावर दुप्पट भाडेवाढीला सामोरे जावे लागेल. १० महिन्यांपूर्वी चेंबूर ते वडाळा दरम्यान १० रुपये तिकीट होते. आता तेच तिकीट २० रुपये असेल, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

चेंबूर ते वडाळा २० रुपये तिकीट

टॅग्स :मोनो रेल्वे