मुंबई : आगामी गणेशोत्सवात गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये ‘मोनो’, मेट्रो रेल्वेच्या महाकाय लोखंडी खांबांचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तर, आग्री पाडा येथे भूमिगत मेट्रो रेल स्थानकाच्या कामामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी लक्ष घालत अडथळे दूर करावेत, अशी मागणी गणेशोत्सव समितीने केली आहे. याबाबत समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी, एमएमआरडीएचे संचालक संजय मुखर्जी यांना पत्र दिले आहे.
यावर्षी ७ सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होणार असून १७ सप्टेंबर रोजी विसर्जन सोहळा पार पडणार आहे. गणेशाच्या आगमन विसर्जनासाठी गेली कित्येक वर्ष वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या मार्गाने आगमन, विसर्जन मिरवणुका मार्गक्रमण करत असतात. मुंबईतील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेश गल्ली (मुंबईचा राजा), रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, काळाचौकीचा महागणपती, वाणी चाळ सोराब चाळ सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ (डिलाई रोडचा राजा) व अन्य मंडळांनी काही समस्या समन्वय समितीच्या निदर्शनास आणल्या आहेत. आर्थर रोड येथील सात रस्ता, मोनो रेल्वे स्टेशन येथे काही लोखंडी खांब उभे करण्यात आले आहे. या खांब्याच्या खालून आगमन व विसर्जन मिरवणुकीस अडथळा निर्माण होणार आहे.
हे खांब खूपच कमी उंचीवर उभारण्यात आले आहे. त्यामुळे लालबाग, लोअर परेल, काळाचौकी आदि विभागातील गणेश मूर्ती आगमन विसर्जन या मार्गाने जाऊ शकत नसल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले आहे. - सात रस्ता ते आग्रीपाडा पोलीस स्टेशन या भागात सुरू असलेल्या भूमिगत मेट्रो स्टेशनच्या वरील रस्ता खूपच खराब व निकृष्ट दर्जाचा असल्याने खेतवाडी, गिरगाव विभागातील गणेशाच्या मूर्तींचे आगमन येथून झाल्यास अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या कालावधीत कुठलेही विध्न येऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी बाप्पाचे आगमन व विसर्जन सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी समन्वय समितीने केली आहे.