Join us

‘मोनो’चा प्रवास होणार वेगवान, महिनाअखेर नवीन गाडी; जादा फेऱ्यांमुळे प्रवाशांना दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 10:22 AM

मोनो रेल्वेच्या ताफ्यात या महिन्याअखेर नवीन गाडी दाखल होणार आहे.

मुंबई : मोनो रेल्वेच्या ताफ्यात या महिन्याअखेर नवीन गाडी दाखल होणार आहे. त्यामुळे मोनो रेल्वेच्या फेऱ्या वाढणार असून, चेंबूर ते महालक्ष्मी येथील संत गाडगे महाराज चौकदरम्यान मोनो रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सध्या मोनो रेल्वेच्या ताफ्यात आठ गाड्या आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात सहा गाड्या प्रवाशांच्या सेवेत असून, दररोज त्यांच्या एकूण ११८ फेऱ्या होत आहेत. सध्या या मार्गिकेवर दर १८ मिनिटांनी मोनो गाड्या सुटत आहेत. मात्र, एवढा वेळ गाडीची वाट पाहणे शक्य नसल्याने प्रवाशांकडून ‘मोनो’तून प्रवासाकडे पाठ फिरवली जाते.  त्यामुळे या मार्गावरील गाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने नव्या गाड्या खरेदी केल्या जात आहेत. 

आणखी गाड्या येणार-

१) खरेदी केल्या जाणाऱ्या गाड्या - १० 

२) कंत्राटाची किंमत - ५९० कोटी

३) एका गाडीला डबे - ४

४) प्रत्येक गाडीची किंमत - सुमारे  ५८.९ कोटी रुपये 

...तर पाच मिनिटांनी एक गाडी 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आणखी १० गाड्या खरेदी करण्यासाठी मेधा सर्व्हो ड्राइव्हज या कंपनीला ऑक्टोबर २०२१ मध्ये कंत्राट दिले आहे. आता कंपनीकडून पहिली गाडी या महिन्याच्या अखेरीस दाखल होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर, उर्वरित गाड्या पुढील वर्षाच्या आत दाखल होणार आहेत. या गाड्या सेवेत दाखल झाल्यानंतर दर पाच मिनिटांनी गाड्या सोडणे शक्य होणार असून, त्यांच्या फेऱ्यांची संख्या २५० पर्यंत पोहोचेल.

जानेवारी २०२४ पर्यंत येण्याचा मुहूर्त टळला -

सध्या एमएमआरडीएकडे आठ गाड्या उपलब्ध आहेत. दरम्यान, एमएमआरडीएने कंत्राट दिले, त्यावेळी सर्व नव्या गाड्या जानेवारी २०२४ पर्यंत येणे अपेक्षित होते. मात्र, या गाड्या दाखल होण्यास विलंब झाला आहे. आता पहिली गाडी या महिन्यात येईल.

सध्या आठ गाड्या -

१)  मोनो रेल्वेची सेवा सुरू झाली तेव्हा आठ रेक उपलब्ध होते.

२) मोनोचे संचालन करणारी स्कोमी कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर ‘एमएमआरडीए’ने मोनोचे संचालन ताब्यात घेतले.

३) स्कोमी कंपनीच्या कार्यकाळात सुट्या भागांचा साठा आणि नवीन रेल्वे गाड्यांच्या बांधणीकडे दुर्लक्ष झाले होते. 

४)  ना-दुरुस्ती आणि अन्य कारणांनी मोनो रेल्वे गाड्यांची संख्या घटली होती. 

५) त्यातून ‘एमएमआरडीए’ने अन्य गाड्यांचे सुट्टे भाग वापरून एक गाडी दुरुस्त केली. 

टॅग्स :मुंबईमोनो रेल्वेएमएमआरडीए