Join us

वीज पुरवठा खंडीत झाल्याने मोनो रेल खोळंबली, प्रवाशांची सुटका

By admin | Published: March 15, 2015 11:58 AM

वीज पुरवठा खंडीत झाल्याने मोनो रेल्वे ठप्प पडल्याची घटना रविवारी सकाळी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोनोत अडकलेल्या १५ प्रवाशांची सुटका केली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १५ - वीज पुरवठा खंडीत झाल्याने मोनो रेल्वे ठप्प पडल्याची घटना रविवारी सकाळी घडली. मोनो रेल ठप्प पडल्याने गाडीत सुमारे १५ प्रवासी अडकले होते. अखेरीस अग्निशमन दलाच्या जवानांनी या प्रवाशांची सुटका केली अन् सर्वांचाच जीव भांड्यात पडला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. 

रविवारी सकाळी  वडाळ्याहून चेंबूरला निघालेली मोनो रेल भक्ती पार्क स्थानकापासून काही अंतरावर अचानक बंद पडली. वीज पुरवठा खंडीत झाल्याने मोनोची सेवा पूर्णपणे कोलमडली. बंद पडलेल्या मोनोमधील प्रवाशांना खाली उतरण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता.  तासाभरानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी क्रेनच्या सहाय्याने मोनोत अडकलेल्या १५ प्रवाशांची सुखरुप सुटका झाली आणि सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. तब्बल तीन तासांनी या मार्गावरील वीज पुरवठा सुरु झाला असून आता मोनो रेलची सेवा पूर्ववत झाली आहे. या घटनेमुळे मोनोममधील सुरक्षा व्यवस्थेच्या त्रुटीसमोर आल्या असून यातून मोनो रेल प्रशासन बोध घेणार का असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत.