मोनोच्या माथ्यावर सॅनिटायझेशनचा भार; तीन महिन्यांसाठी ४८ लाखांचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 04:55 AM2020-10-04T04:55:21+5:302020-10-04T04:55:34+5:30
एमएमआरडीएसाठी पांढरा हत्ती ठरलेल्या मोनो रेल्वेला लॉकडाऊनपूर्व काळात तिकीट विक्रीतून महिन्याकाठी सरासरी ५० लाखांचे उत्पन्न मिळत होते.
मुंबई : एमएमआरडीएसाठी पांढरा हत्ती ठरलेल्या मोनो रेल्वेला लॉकडाऊनपूर्व काळात तिकीट विक्रीतून महिन्याकाठी सरासरी ५० लाखांचे उत्पन्न मिळत होते. आता अनलॉकच्या टप्प्यात जेव्हा मोनो रेल्वे सुरू होईल तेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव सॅनिटायझेशन करावे लागणार आहे. त्यापोटी दर तीन महिन्यांसाठी किमान ४८ लाख ३२ हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.
चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या स्थानकांदरम्यान १९.५४ किमी धावणाऱ्या या मोनो रेल्वेतून लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी दैनंदिन १० हजार प्रवासीसुद्धा नव्हते. प्रवासी संख्या अत्यल्प असल्याने वर्षाकाठी जेमतेम ६ कोटींचे उत्पन्न तिकीट विक्रीतून मिळते. त्यापेक्षा जास्त खर्च इथल्या सुरक्षारक्षक व श्वानपथकांवर होत आहे. त्यात आता सॅनिटायझेशनच्या खर्चाची भर पडणार आहे.
मोनोच्या १७ रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची जागा सुमारे ५ लाख ६७ हजार चौरस फूट आहे. तर प्रशासकीय कार्यालये ८९ हजार १५० चौ. फुटांची आहेत. ती दररोज सोडियम हायपोक्लोराईटने सॅनियाईज केली जाणार आहेत. या मार्गावरील पाच ट्रेनची जागा १ लाख १० चौ.मी. असून ड्रायव्हर केबिनसह त्यांचेही दररोज सॅनिटायझेशन केले जाणार आहे. या कामासाठी एमएमआरडीएने निविदा प्रसिद्ध केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.