मुंबई : चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर चार मोनो रेल्वे धावत आहेत. मात्र, दर २२ मिनिटांनी त्या धावत असल्याने एक मोनो रेल्वे गेल्यावर प्रवाशांना स्थानकावर बराच काळ ताटकळत उभे राहावे लागते. त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता आता या मार्गावर आणखी दोन मोनो रेल्वे दाखल होणार असून त्या दर १५ मिनिटांनी धावतील.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन नवीन मोनो रेल्वेपैकी एक मार्च महिन्याच्या शेवटी आणि दुसरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दाखल होईल. त्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर २२ मिनिटांनी धावणारी मोनो रेल्वे १५ मिनिटांच्या फरकाने धावेल.मोनो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर बुधवारी मोनो रेल्वेने प्रवास केलेल्या प्रवाशांचा आकडा १४ हजार ७६४ एवढा होता. याद्वारे प्रशासनाला २ लाख ४२ हजार ७५४ रुपये एवढा महसूल मिळाला. मात्र, रविवारी झालेल्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर बुधवारची मोनो रेल्वेची प्रवासी संख्या सोमवार आणि मंगळवारच्या तुलनेत घटली.दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए)ने मोनोच्या तिकीट दरात वाढ केली आहे. पूर्वी किमान पाच रुपये असलेला तिकीट दर आता १० रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण १९.५४ किलोमीटर प्रवासाकरिता प्रवाशांना ४० रुपये मोजावे लागत आहेत. मोनोचे तिकीट दर जास्त असून, ते कमी करण्यात यावेत, अशी मागणी मुंबईकरांकडून होत आहे.>असा आहे प्रकल्प! : च्मोनो रेल्वेचा संपूर्ण मार्ग हा १९.५४ किलोमीटर लांबीचा आहे.च्चेंबूरपासून महालक्ष्मीपर्यंतचा प्रवास करण्यासाठी ९० मिनिटे लागत होती.च्आता मोनोचा दुसरा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर हा प्रवास करण्यासाठी ३० मिनिटे लागत आहेत.च्संपूर्ण टप्प्यावर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मोनो रेल्वे दर २२ मिनिटांनी धावते.
आता दर पंधरा मिनिटांनी धावणार मोनो रेल्वे!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 12:37 AM