मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल सातएक महिन्यांनी म्हणजे रविवारी मुंबईची मोनोरेल प्रवाशांना घेऊन धावली आहे. मोनोरेलचा प्रवास रविवारपासून मुंबईकरांसाठी खुला झाला असून, आता सोमवारपासून मेट्रोदेखील मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मेट्रो आणि मोनो अशा दोन्ही सेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल होत असल्याने साहजिकच लोकलवरील भार कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मोनोरेल चालविली जात आहे. मोनोरेल सुरु करण्यापूर्वी सात महिन्यांपासून प्राधिकरणाकडून मोनोरेलची देखभाल दुरुस्ती केली जात होती. शनिवारी प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी देखील मोनोरेलची पाहणी केली होती. शिवाय तिकिट यंत्रणेची देखील माहिती घेतली होती. रविवारी मोनोरेल सेवेत दाखल झाली असून, कोरोनाचे सर्व नियम पाळले जात आहेत. नो मास्क, नो एन्ट्री या नियम मोनोरेलच्या प्रवाशांनादेखील लागू असणार आहे. सकाळी ७.०३ ते सकाळी ११.४० आणि दुपारी ४.०३ ते रात्री ९.२४ या वेळेत मोनो रेलची सेवा सुरु राहील.मेट्रो सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या वेळेत धावेल. मेट्रो सेवा सुरु होण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर प्रवेशद्वार खुले केले जाईल. मेट्रो सेवा बंद होण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर प्रवेशद्वार बंद केले जाईल. २०० फेऱ्या सुरू राहणार. गर्दीच्या वेळी दर साडे सहा मिनीटांनी तर गर्दी नसलेल्या वेळेत दर आठ मिनिटांनी मेट्रो सेवा असेल. प्रत्येक फेरीत ३०० प्रवासी प्रवास करू शकतील. वर्सोवा ते घाटकोपर मार्गावरील प्रत्येक स्थानकावर मेट्रो थांबण्याच्या कालावधी हा आता २० ते ४० सेकंदांनी वाढवला असल्याने मेट्रोत सहज आत येता येईल. प्लॅस्टिक टोकन ऐवजी कागदाचे तिकीट देण्यात येईल. स्मार्ट कार्डमध्ये मार्च पूर्वी जर शिल्लक पैसे असतील तर आता त्यांचा उपयोग त्यांना तिकीटसाठी होईल.