समस्यांच्या विळख्यात अडकली ‘मोनो’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 11:59 PM2020-01-06T23:59:56+5:302020-01-07T00:00:04+5:30
चेंबूर ते वडाळा या पहिल्या आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्प्यातील मोनोरेल सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) चालविण्यात येत आहे.
मुंबई : चेंबूर ते वडाळा या पहिल्या आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्प्यातील मोनोरेल सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) चालविण्यात येत आहे. तब्बल तीन हजार कोटी रुपये खर्चून सुरू केलेल्या या मोनोरेलमध्ये अद्याप विविध समस्या कायम आहेत. मात्र, या समस्या सोडविण्यात एमएमआरडीएला अद्याप यश आलेले नाही. या समस्या एमएमआरडीएकडून कधी सोडविण्यात येणार, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
मोनो स्थानकांवर स्वच्छतागृहांचा अभाव, मोनोमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड, वेळकाढू प्रवास, स्थानकाच्या पायऱ्यांवर बेघर- गर्दुल्यांच्या वावरामुळे प्रवासी हैराण, तब्बल वीस मिनिटांच्या अंतराने मोनोच्या फेºया, मार्गिकेच्या खाली अनधिकृत फेरीवाले आणि गाड्यांमुळे वाहतूककोंडी, अशा विविध समस्यांचा विळखा मोनोला असून, या समस्या दूर व्हाव्यात, अशी विनंती प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
वेळकाढू प्रवास
सध्या दर २० ते २५ मिनिटांनी मोनो धावत असल्याने प्रवाशांना मोनो स्थानकातच वाट पाहावी लागते. मोनो स्थानकांमध्ये मर्यादित बाके असल्यामुळे मोनोची प्रतीक्षा करणाºया प्रवाशांना स्थानकातच ताटकळतच उभे राहावे लागत आहे. मोनोचा वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसºया टप्प्यावर मोनो सुरू झाल्याने मोनोच्या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र, हा प्रवास आणखी जलद करण्यासाठी मोनोच्या फेºयांमध्ये वाढ करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
>मोनो स्थानकाच्या जिन्यांवर बेघर, गर्दुल्ले
चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशा मोनोरेलच्या संंपूर्ण मार्गावर प्रवाशांना विविध समस्या भेडसावत आहेत. यामध्ये मोनोरेलच्या जिन्यांवर बेघर, गर्दुल्ल्यांचा वावर असल्याने प्रवाशांना असुरक्षित वाटते. यासह मोनो मार्गिकेच्या खाली आणि स्थानक परिसरामध्ये फेरीवाले आणि अनधिकृतपणे गाड्या पार्किंग केलेल्या असतात, तसेच तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण मोनोमध्ये वाढत असून, तांत्रिक बिघाड होऊ नये, म्हणून प्रशासनाने लक्ष घालावे, अशी सूचना प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
>मला दररोज कामानिमित्त लालबागला जावे लागते. चेंबूर ते लालबाग हा प्रवास करण्यासाठी मी दररोज बेस्ट बसचा उपयोग करतो. मी माझ्या कामाच्या ठिकाणी मोनोरेलनेसुद्धा जाऊ शकतो, परंतु मोनोरेलचा प्रवास हा अत्यंत वेळकाढू आहे. बेस्ट बस मला मनोरेलपेक्षा पंधरा ते वीस मिनिटे लवकर पोहोचवते. मोनोरेल फोर चेंज म्हणून महिन्यातून एकदा प्रवास करतो, परंतु दररोजच्या प्रवासाला मी मोनोचा प्रवास नाकारतो.
- आनंद रोकडे, प्रवासी
>मोनोच्या स्थानकांत स्वच्छतागृहांचा अभाव
तब्बल दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मोनोरेलचे दोन्ही टप्पे पूर्ण झाले. या प्रकल्पासाठी दोन हजार ४६० कोटी रुपये खर्च झाले असले, तरी प्रवाशांसाठी स्वच्छतागृहासारखी सोय करताना एमएमआरडीएची कोंडी झाल्याचे दिसते.
सरकते जिने, उद्वाहने आदी सुविधा मोनोच्या स्थानकांत आहेत.
मात्र, या सतरा स्थानकांमध्ये प्रत्येकी एकच स्वच्छतागृह असल्याने, प्रवाशांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते.
पुरुष आणि महिला प्रवासी आणि कर्मचाºयांसाठी एकच स्वच्छतागृह असल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ आणि महिलांची अडचण होत आहे.
मोनो स्थानकांत सुरुवातीला बांधलेली स्वच्छतागृहे पूर्वी फक्त कर्मचाºयांच्या वापरासाठी होती.
आता प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे ही स्वच्छतागृहे सर्वांसाठी खुली केली आहेत.