मुंबई : एमएमआरडीएने जाहीर केल्याप्रमाणे वडाळा ते जेकब सर्कलपर्यंतचा दुसरा टप्पा २ फेबु्रवारी २०१९ ला सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी करारानुसार मोनो रेल्वेचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या स्कोमी कंपनीने डिसेंबर, २०१८ पर्यंत टप्प्याटप्प्याने १० गाड्या उपलब्ध करून द्यायला हव्यात. परंतु नोव्हेंबर संपत आला तरी अद्याप त्यांच्याकडून एकही गाडी मोनोच्या ताफ्यात दाखल झाली नसल्याने मोनोचा दुसरा टप्पा २ फेब्रुवारीला तरी सुरू होईल का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्कोमी कंपनीने गाड्या वेळेवर न दिल्यास भविष्यात कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत असल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा हा वडाळा ते जेकब सर्कलपर्यंत आहे. या भागातील प्रतीक्षानगरच्या पट्ट्यात मोेठ्या प्रमाणावर वसाहती वाढल्या आहेत. त्यामुळे दुसºया टप्प्यात मोनोला चांगला फायदा होईल, असा विश्वास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या अधिकाºयांना आहे. मोनोचा पहिला टप्पा १ सप्टेंबरला सुरू केल्यानंतर एमएमआरडीएने पुढच्या वर्षी २ फेब्रुवारीला मोनोचा दुसरा टप्पा सुरू होईल, अशी घोषणा केली. सध्या पहिल्या टप्प्यात मोनोकडे १० गाड्या आहेत.
मोनोचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी मोनोला आणखी १० गाड्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत गाड्यांचा पुरवठा करावा असे स्कोमी कंपनीला सांगण्यात आले होते. त्यापैकी प्रत्येकी दोन गाड्या आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात उपलब्ध होणे अपेक्षित होते. मात्र, नोव्हेंबर महिना संपत आला तरी स्कोमीकडून एकही नवीन गाडी देण्यात आलेली नाही. तर पहिल्या टप्प्यातील १० गाड्यांपैकी सध्या ६ गाड्या सुरू आहेत. उर्वरित चार गाड्या या तांत्रिक कारणामुळे मोनोच्या डेपोत धूळखात आहेत. स्कोमी कंपनीने नवीन गाड्या देण्यास विलंब केला तर एमएमआरडीए प्रशासन मोनोचा दुसरा टप्पा २ फेब्रुवारी २०१९ पर्यंत सुरू करण्यास अपयशी ठरेल. त्यामुळेच काही दिवसांत कंपनीने गाड्या न पुरविल्यास एमएमआरडीए स्कोमीवर कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिला आहे.