मुंबई - सध्या बंद असलेली मोनोरेल मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मोनोरेलला अद्याप सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले नाही. येत्या २ आठवड्यांमध्ये हे प्रमाण पत्र मिळेल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे. मोनोरेल लोकांच्या वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच मोनो सुरू होणार आहे.नोव्हेंबर २०१७ मध्ये घडलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर अद्याप मुंबईकरांना मोनोरेलची प्रतीक्षा कायम आहे. मोनोरेलचा वडाळा ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पादेखील अद्याप सुरू झालेला नाही. दररोज मोनोच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. चाचणीसाठी धावणारी मोनोरेल पाहिल्यानंतर मोनो कधी सुरू होणार, याबाबतची उत्सुकता मुंबईकरांमध्ये आहे. मात्र, ही प्रतीक्षा लवकरच संपेल, असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. मोनोरल धावण्यासाठी आवश्यक असलेले सुरक्षा प्रमाणपत्र येत्या २ आठवड्यांमध्ये मिळेल, असे सांगण्यात येत आहे.प्रयत्न सुरूरेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांकडून अद्याप मोनोरेलसाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले नाही. मोनोरेलच्या चाचण्या सुरू आहेत. आम्ही पूर्ण तयारी केली आहे. मार्च महिन्यातच मोनोरेल पुन्हा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.- दिलीप कवठकर, प्रकल्प संचालक, एमएमआरडीए.कंत्राटदाराचाशोध सुरूच!मोनोरेल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार असे म्हटले जात असले, तरी अद्याप मोनोरेलच्या देखभालीसाठी कंत्राटदार मिळालेला नाही. तोदेखील मोठा प्रश्न एमएमआरडीएसमोर आहे. त्यामुळे मार्चअखेर मोनोरेल सुरू करण्याचे एमएमआरडीएचे प्रयत्न असले, तरी कंत्राटदार न मिळाल्यास मोनोरेल सुरू होण्यास एप्रिल उजाडणार, अशी शक्यताही नाकारता येत नाही.
मार्च महिनाअखेर मोनो धावणार, दोन आठवड्यांत मिळणार सुरक्षा प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 6:05 AM