लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपी ही नवसंजीवनी देणारी थेरपी ठरली आहे. या उपचारपद्धतीने नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटीमध्ये चार रुग्णांच्या प्रकृतीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा दिसून आली. अनेक आजार असलेल्या व्यक्तींवर १ जूनपासून या थेरपीचा वापर करून उपचार करण्यात आले. या रुग्णांपैकी दोन रुग्ण अत्यंत स्थूल होते.
मोनोक्लोनल अँटिबॉडी ही प्रयोगशाळेत तयार केलेली प्रथिने असतात. आजार होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घातक घटकांशी लढा देण्याऱ्या रोगप्रतिकारक क्षमतेप्रमाणे ही प्रथिने कार्य करतात.
नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजी विभागाचे सल्लागार डॉ. सलील बेंद्रे म्हणाले की, ५८ वर्षीय स्थूल, दीर्घकालीन धूम्रपानाचे व्यसन असलेल्या, १३० किलो वजन (बीएमआय ४६) असलेल्या आणि गंभीर स्वरूपाचा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया सिंड्रोम असलेल्या व्यक्तीला २ जून रोजी अँटिबॉडी कॉकटेल देण्यात आले. हे प्राप्त करणारी ही पहिलीच व्यक्ती होती. त्या व्यक्तीला धोका होता, तिला हायपोक्सिया नव्हता; पण अंगात सौम्य स्वरूपाची कणकण होती. ३० मे रोजी रुग्णाची कोविड १९ चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे गंभीर स्वरूपाच्या कोविड - १९ चा अंदाज बांधून आम्ही मोनोक्लोनल कॉकटेल उपचार देण्याचा निर्णय घेतला. पुढील ४८ तास रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आले आणि मग त्याला डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णाला असलेल्या सहआजारांमुळे त्याला गंभीर स्वरूपाचा कोरोना होण्याची शक्यता होती; पण दोन आठवड्यांनतर त्याची प्रकृती स्थिर आहे आणि त्याच्यात कोणतीही लक्षणे नाहीत, असे त्यांनी सांगतले.
अन्य एका खाटेला खिळलेल्या ५० वर्षीय, १२५ किलो वजनाच्या (बीएमआय ४५), पोलियोमायलायटिस, हायपरटेन्शन आणि बॉर्डरलाइन मधुमेह असलेल्या महिलेच्या प्रकृतीमध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा दिसून आली. नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एंडोक्रिनोलॉजी आणि डायबेटोलॉजी विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. गिरीश परमार या महिलेवर उपचार करत होते. ते म्हणाले की, कोविडचा संसर्ग झाल्यानंतर सातव्या दिवशी ही महिला हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. रुग्णामध्ये खोकला आणि तापाची सौम्य लक्षणे होती. ती उच्च जोखीम असलेली रुग्ण असल्यामुळे आजार बळावण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच आम्ही ९ जून रोजी तिला मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल दिले. सध्या या महिलेमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत आणि तिची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे, असे डॉ. परमार म्हणाले.
याव्यतिरिक्त अनियंत्रित मधुमेह व हृदयविकार असलेली ५० वर्षांची महिला आणि हायपरटेन्शन व सात दिवस सतत ताप असलेल्या ५७ वर्षीय पुरुषालाही हे अँटिबॉडी कॉकटेल देण्यात आले. दोन्ही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे होती. त्यांना सहआजार असूनही मोनोक्लोनल अँटिबॉडीमुळे त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा दिसून आली.
नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ऑपरेशन्स विभागाच्या प्रमुख मंगला डेंबी यांनी कॉकटेल थेरपीबद्दल सांगितले की, डॉक्टरांनी या उपचारपद्धतीचा वापर करून उच्च जोखीम असलेल्या चारही रुग्णांना गंभीर स्वरूपाचा संसर्ग होण्याला प्रतिबंध केला. या रुग्णांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा दिसून आली. आमच्या रुग्णांना सर्वात प्रगत उपचारपद्धती उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू.
...............................................................