मोनोला एप्रिल अखेरचा ‘मुहूर्त’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 07:09 AM2018-04-03T07:09:41+5:302018-04-03T07:09:41+5:30
गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्याने मोनोरेल सुरू झालेली नाही.
मुंबई - गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्याने मोनोरेल सुरू झालेली नाही. सुरक्षा आयुक्तांनी नुकतेच मोनोरेलचे सर्वेक्षण केले. मोनोरेलच्या सुरक्षेबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केल्यामुळे लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल आणि दोन्ही टप्प्यांतील (चेंबूर ते वडाळा, वडाळा ते जेकब सर्कल) मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे देण्यात आली आहे.
९ नोव्हेंबर २०१७ रोजी मोनोरेलच्या डब्याला मैसूर कॉलनी स्थानकाजवळ आग लागली, त्यानंतर अद्याप मोनोरेल सुरू झाली नाही. मोनोच्या सततच्या दुर्घटना आणि ९ नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीनंतर सर्वच स्तरांतून मोनोच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
मागील पाच महिन्यांत मोनोरेलची संपूर्ण दुरुस्ती करण्यात आली आहे; परंतु रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांकडून मोनोरेलला सुरक्षा प्रमाणपत्र मिळणे बाकी होते. आयुक्तांकडून सर्वेक्षण पूर्ण झाले असून लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल. सर्वेक्षणादरम्यान, ट्रॅक्शन फ्रिक्शन, टेलिकम्युनिकेशन, ब्रेक यंत्रणा, मार्गिकेतील अडथळे या सर्वांचा अभ्यास करण्यात आला आहे.