जुन्याच तिकीट दरात पुन्हा धावली मोनो रेल; आता प्रतीक्षा दुसऱ्या टप्प्याची
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 03:57 AM2018-09-02T03:57:30+5:302018-09-02T03:58:13+5:30
देशातील पहिली मोनो रेल जी १० महिन्यांपासून बंद होती, ती चेंबूर ते वडाळा दरम्यान शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा एकदा धावू लागली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी मोनोरेलला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई : देशातील पहिली मोनो रेल जी १० महिन्यांपासून बंद होती, ती चेंबूर ते वडाळा दरम्यान शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा एकदा धावू लागली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी मोनोरेलला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळाले. मोनो रेलचा हा टप्पा सुरू करताना प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ करण्याचा एमएमआरडीए प्रशासनाचा विचार होता. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन, नंतरच भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, असे एक सदस्यीय समितीने अहवालात नमूद केले आहे. त्यानुसार, ११ रुपये या पूर्वीच्या तिकीटदरात वाढ करण्यात आलेली नाही.
शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून चेंबूर आणि वडाळा या दोन्ही स्थानकांवरून मोनो धावू लागली. पहिल्याच दिवशी शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सोडल्यास, मोनोरेलला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. एमएमआरडीएने जुनेच तिकीट दर कायम ठेवूनही प्रवाशांनी मोनोकडे पाठच फिरवल्याचे चित्र होते.
मोनोच्या पहिल्या टप्प्याला मिळालेल्या प्रतिसादावरच मोनोच्या पुढील टप्प्याचे भवितव्य अवलंबून आहे. शनिवारी पहिला दिवस असल्याने गर्दी कमी होती. मात्र, रविवारी सुट्टी असल्याने त्या दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास एमएमआरडीए प्रशासनाला आहे.
मोनो सुरू झाली, पण तोटा भरेल का?
देशातील पहिली मोनो रेल फेब्रुवारी, २०१४ रोजी मुंबईतील चेंबूर ते वडाळा मार्गावर धावली. मात्र, नोव्हेंबर, २०१७ मध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकात मोनोला आग लागली. या आगीत मोनोचे २५ कोटींचे नुकसान झाले, तेव्हापासून मोनो बंद होती.
मोनो बंद झाल्याने गेल्या १० महिन्यांत एमएमआरडीएला दर महिन्याला १ कोटी ८० लाख रुपयांचा तोटा झालाय. हा तोटा भरून काढण्याची मोठी कसरत एमएमआरडीए प्रशासनाला करावी लागणा आहे.
चेंबूर ते वडाळा मार्गावर सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत मोनोरेल धावेल
दिवसभरात १३० फेºया
वडाळामधून रात्री ९ वाजून ५३ मिनिटांनी शेवटची फेरी
चेंबूरमधून रात्री १० वाजून ८ मिनिटांनी शेवटची फेरी