मुंबई : दहा महिन्यांनंतर पुन्हा सुरु झालेली मोनोरेल दुसऱ्या दिवशीच ठप्प झाली. या काळात टीव्ही केबलचालकांनी मोनोरेलच्या ट्रॅकवर बेकायदेशीररित्या केबल टाकल्याने चेंबुर नाका स्थानकाजवळ मोनोरेल बंद पडली होती.
मोनोरेल बंद पडल्याचे कळताच अग्नीशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोनोरेलच्या मार्गात अचानक अडथळा आल्याने नेमके कारण काय याचा तपास करण्यात येत होता. यावेळी केबल चालकाने लटकवलेली केबल मोनोसेवा ठप्प करण्यास कारणीभूत असल्याचे समोर आले.
यानंतर अग्नीशामक दलाच्या जवानांनी केबल कापल्यानंतर संध्याकाळी 4.40 मिमाटींनी मोनोरेल सुरळीत करण्यात आली. मोनोरेल गेल्या दहा महिन्यांपासून बंद असल्याने या खांबांचा वापर केबल माफियांनी इंटरनेट, टीव्हीच्या केबल टाकण्यासाठी केला आहे. मात्र, मोनोरेल सुरु करण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याने मोनोरेलची सुरक्षा पुन्हा चर्चेत आली आहे.